Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde Tendernama
मुंबई

ठाण्यातील क्लस्टरसाठी महाप्रित 5 हजार कोटी उभारणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे येथील महत्वाकांक्षी नागरी पुनर्निर्माण कार्यक्रमांतर्गत क्लस्टर योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या महाप्रित या कंपनीस ५ हजार कोटी इतका निधी गुंतवणूकदारांकडून इक्वीटी व कर्जरोख्याच्या स्वरुपात उभारण्यास रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते.

या योजनेत ६ हजार ४९ कोटी इतका खर्च अपेक्षित असून टेकडी बंगला, हजुरी व किसन नगर भागात क्लस्टर गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येईल. त्याचप्रमाणे भिवंडीतील चाविंद्रे, पोगाव येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिका, चंद्रपूर महापालिकेअंतर्गत म्हाडाच्या कोसरा येथे सदनिका, यवतमाळ व वडगाव येथील सदनिका, ठाणे, नागपूर व पुणे महापालिकेत अक्षय ऊर्जा खर्च बजेट मॉडेलवर आधारित प्रकल्प, मुंबई महानगरात ईव्ही पार्क, मेडीसिटी, मॅनग्रोव्ह पार्क, केमिकल हब, डिजिटल युनिव्हर्सिटी हे प्रकल्प देखील राबविण्यात येतील. या सर्व प्रकल्पांना मिळून १० हजार कोटी रुपये लागतील.