मुंबई (Mumbai) : मुंबई आणि मीरा-भाईंदर या दोन शहरांना जोडणाऱ्या ५ किमी ला़ंब दहिसर-भाईंदर उन्नत रस्त्याच्या प्रकल्पाला अद्याप सुरुवातही झालेली नसताना या प्रकल्पाच्या खर्चात दुपटीने वाढ झाली आहे. महापालिकेने या प्रकल्पाच्या १,९९८ कोटी रुपयांच्या खर्चासाठी टेंडर प्रक्रिया राबवली होती. त्यांत लार्सन अॅण्ड टुब्रो (एल अॅण्ड टी) कंपनीने सर्वात कमी किमतीची (१,९८१ कोटी रुपये) बोली लावली. या कंपनीला टेंडर देण्याचे निश्चित झाले आहे. मात्र टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता या प्रकल्पाचा खर्च ४,०२७ कोटींवर गेला आहे.
मुंबई उपनगर आणि मिरा-भाईंदर-विरार या ठिकाणची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दहिसर-भाईंदर उन्नत रस्ता प्रकल्प राबवण्याचा निर्णय जून २०२२ मध्ये घेण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाचा एकूण खर्च १,६०० कोटी रुपये अंदाजित होता. मात्र ठेकेदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा ऑक्टोबर २०२२ मध्ये टेंडर मागवण्यात आले. त्यावेळी या प्रकल्पाची किंमत २,५२७ कोटी रुपये अंदाजित करण्यात आली; परंतु टेंडर प्रक्रियेत सहभागी कंपन्यांबरोबर चर्चा केल्यानंतर १,९९८ कोटी रुपयांत काम करण्याची तयारी दर्शवली. मात्र आता या रस्त्याच्या खर्चात दुपटीने वाढ झाली असून हा खर्च ४,०२७ कोटी रुपये अंदाजित करण्यात आला आहे.
पर्यावरण विभागाची परवानगी, व्हुईग गॅलरी, सीसी टीव्ही कॅमेरे बसवणे, ध्वनिरोधक बसवणे अशा विविध कामांमुळे दहिसर-भाईंदर उन्नत रस्ते प्रकल्प खर्चात वाढ झाल्याचे मुंबई महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. या उन्नत रस्त्याचे काम ४२ महिन्यांत (पावसाळा वगळून) पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दहिसर (पश्चिम) ते भाईंदर (पश्चिम) दरम्यान जोडणाऱ्या उन्नत मार्ग प्रकल्पाबाबत अखेर टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून यासाठी ४ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. एलअँडटी हे काम करणार आहे. हा उन्नत मार्ग एमएमआरडीएच्या माध्यमातून बांधण्यात येणार होता; परंतु त्यांनी हा पूल न बांधल्याने याची उभारणी मुंबई महापालिकेच्यावतीने केली जात असून यासाठी केला जाणारा सर्व खर्च महापालिका करणार आहे.
दहिसर पश्चिम आणि भाईंदर पश्चिमेला कनेक्टिव्हिटी
उन्नत मार्गाची एकूण लांबी : ५ किमी
उन्नत मार्गाची रुंदी : ४५ मीटर
एकूण मार्गिका : ८
वाहनांचा अंदाजित वापर : ७५ हजार प्रतिदिन
प्रकल्पासाठी अंदाजित कालावधी : ४२ महिने
प्रकल्पासाठी अंदाजित खर्च : ४ हजार २७ कोटी रुपये
देखभाल आणि दुरुस्ती खर्च : (३ वर्षे) २३ कोटी रुपये
आंतरबदल मार्गिकांची संख्या : २