मुंबई (Mumbai) : खोणी-काटई मार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम अजूनही पूर्ण झाले नसताना काम पूर्ण होण्याआधीच काँक्रीट रस्त्यावर खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून ठेकेदाराकडून हा रस्ता पूर्ववत करून घेण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
खोणी-काटई मार्गाच्या एका लेनच्या कमला २२ डिसेंबर २०२२ मध्ये सुरूवात करण्यात आली. काँक्रीटीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र काम पूर्ण होण्याआधी मार्ग खड्डेमय होण्यास सुरुवात झाली असल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हे काम पूर्ण होण्याआधी खड्डे पडल्याने एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा कामाकडे काणाडोळा झाल्याचे दिसून येते. सध्या या मार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून गटारांची कामे सुरू आहेत. मात्र, ठेकेदाराच्या कामावर नियंत्रण न ठेवल्याने सध्या या मार्गावर काँक्रीट रस्त्यावरच खड्डे पडल्याने कामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे. तसेच खड्डे पडलेल्या ठिकाणी नव्याने काँक्रीटचा रस्ता बनवावा अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.
ठाणे जिल्ह्यातील काटई नाका ते तळोजा औद्योगिक वसाहतीपर्यंतच्या रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्यातील रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. काटई ते नेवाळी नाका या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावर विना अडथळा आणि वेगवान प्रवास करता येणार आहे. याच मार्गावर खोणी नाक्यापासून तळोजा औद्योगिक वसाहतीकडे जाणारा मार्ग आहे. या मार्गावर पूर्वी औद्योगिक वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत होती. त्यात पुणे द्रुतगती महामार्गावर पोहोचण्यासाठी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या भागांतून प्रवासी या रस्त्याचा वापर करत होते. त्यामुळे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे आणि काँक्रिटीकरणाचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते. त्यातील एका टप्प्याचे काम नुकतेच पूर्ण झाले.
खोणी ते तळोजा औद्योगिक वसाहत या मार्गाच्या दोन मार्गिकांचे काम पूर्ण झाले आहे. याच मार्गाचे रुंदीकरण केले जाणार आहे. या मार्गावर गेल्या काही वर्षांत शेकडो नवी गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यांना वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या रस्त्यावर औद्योगिक वाहतूकही मोठ्या प्रमाणावर होते. या रुंदीकरणामुळे प्रशस्त मार्ग उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तळोजा, पनवेल, खारघर, नवी मुंबई आणि जुन्या राष्ट्रीय महामार्गावर ये-जा सुलभ होणार आहे.