पुणे (Pune) : जमिनीची मोजणी करावयाची आहे. त्यासाठी आता सुट्टी काढण्याची अथवा भूमी अभिलेख कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण आता ऑनलाइन अर्ज आणि मोजणीचे पैसे घरबसल्या भरता येणार आहे. त्यांनतर ऑनलाइनच मोजणीची तारीख आणि सर्व्हेअरचे नाव देखील कळणार आहे. हवेली व बारामतीसह राज्यातील दहा तालुक्यात प्रायोगिक तत्त्वावर सुविधा भूमि अभिलेख विभागाने उपलब्ध करून दिली आहे.
गेल्या काही वर्षांत जमिनींच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे जमिनीची मोजणीसाठी येणाऱ्या अर्जांची संख्या देखील वाढली आहे. गतीने आणि अजूक मोजणी करण्यासाठी भूमि अभिलेख विभागाकडून सर्वसोयी सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या अंतर्गत यापूर्वीच ई मोजणीचे सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचा पुढचा टप्पा म्हणजे आता ‘ई मोजणी व्हर्जन २’ ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय भूमि अभिलेख विभागाने घेतला आहे.
सध्या काय पद्धत आहे?
- मोजणी करावयाची असेल तर भूमी अभिलेख कार्यालयात जावे लागते
- तेथे लेखी अर्ज केल्यानंतर मोजणीचे चलन दिले जाते
- ते चलन घेऊन बँकेत भरल्यानंतर त्याची प्रत पुन्हा भूमी अभिलेख कार्यालयात दाखल करावी लागते
- त्यानंतर तो अर्ज ऑनलाइन फीड केला जातो.
- त्यानंतर मोजणी कोणत्या तारखेला होणार आहे, सर्व्हेअर कोण असणार आहे, यांची माहिती मिळते
- या कार्यपद्धती पूर्ण करण्यास नागरिकांचा मोठा वेळ जातो
- त्यानुसार मोजणी कार्यालयातदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होते
- त्यातून गैरप्रकार घडतात
आता काय होणार?
- ‘ई-मोजणी व्हर्जन २’मध्ये जमिनींच्या मोजणीसाठी नागरिकांना ऑनलाइन अर्ज करता येणार
- त्यानंतर त्यासाठीचे मोजणी शुल्कदेखील ऑनलाइनच कळणार आहे
- ते भरण्याची सुविधादेखील ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहे
- त्यामुळे भूमी अभिलेख कार्यालयात प्रत्यक्षात जाऊन ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज नाही
प्रायोगिक तत्त्वावर हवेली, बारामतीसह राज्यातील दहा तालुक्यांमध्ये तो प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला. त्यासाठी आवश्यक असलेली संगणक प्रणाली एनआयसीच्या मदतीने विकसित करण्यात आली आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी या दहा तालुक्यांत लागू करण्यात आली आहे. ती राज्यात लागू करण्यात येणार आहे.
- किशोर तवरेज, भूमी अभिलेख विभाग
कमी वेळेत, गतीने आणि अचूक मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख विभागाच्या सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. त्याचा भाग म्हणून आता ई-मोजणी व्हर्जन २ ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेत बचत होणार आहे आणि मोजणीसाठीचा अर्ज करण्याची प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे.
-निरंजन सुधांशू, जमाबंदी आयुक्त
आकडे बोलतात...
किमान
३ हजार
पुणे जिल्ह्यात दर महिन्याला दाखल होणारी प्रकरणे
सुमारे एक लाखाहून अधिक
वर्षभरात राज्यात दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या