मुंबई (Mumbai) : कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने हद्दीतील खड्डे गणेशोत्सवाआधी बुजविण्यात येतील असा दावा केला होता. हा दावा आत्ता फोल ठरला आहे. त्यामुळे लवकरच आम्ही प्रशासनाला भेटून याचा जाब विचारणार आहोत, असा इशारा भाजपने दिला आहे. तर नवरात्रौत्सवाच्या आधी एक आठवड्यात खड्डे भरले गेले नाहीत तर अधिकाऱ्यांना खड्ड्यात टाकणार असा इशारा शिवसेना शिंदे गटाने दिला आहे.
शहरातील रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. खड्ड्यामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. त्याचा त्रास वाहन चालकांसह नागरिकांना सहन करावा लागत आहे. खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने १८ कोटींचे टेंडर काढले होते. ही कामे महापालिकेने १० प्रभागात १३ ठेकेदारांना विभागून दिली होती. गणेसोत्सवाआधी खड्डे बुजविले जातील असा दावा महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिला होता. मात्र, विसर्जन झाले तरी खड्डे भरले गेलेले नाहीत. महापालिकेच्या या चालढकल कारभाराचा मनसेच्यावतीने आंदोलन करुन निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्या पाठोपाठ भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने महापालिकेस लक्ष्य केले आहे.
खड्ड्यांविषयी बोलताना भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी म्हणाले की, महापालिका प्रशासनाने गणपती उत्सवाआधी खड्डे बुजविले जातील असे सांगितले होते. मात्र तशी परिस्थिती नाही. महापालिकेस याचा जाब विचारु, असा इशाराही त्यांनी दिला आहे. महापालिका हद्दीतील खड्डे नवरात्र उत्सवाआधी खड्डे बुजविले जाणार का अशी विचारणा शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना केली असता त्यांनी खड्डे भरु असे सांगितले आहे. त्यांनी रस्त्यावरील खड्डे भरले नाही तर त्या अधिकाऱ्यालाच खड्ड्यात टाकू असा इशारा प्रशासनाला दिला आहे.