JNPA Tendernama
मुंबई

जेएनपीएच्या मालकीचे 'जेएनपीसीटी' बंदर 'पीपीपी'वर हस्तांतरित

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : उरण (Uran) येथील जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण अर्थात जेएनपीए (JNPA) मधील स्वतःच्या मालकीचे असलेले जेएनपीसीटी (JNPCT) बंदर जेएम बक्षी पोर्ट्स एंड लॉजिस्टिक लिमिटेड यांना बांधा, वापर आणि हस्तांतरीत करा (पीपीपी) या केंद्र सरकारच्या धोरणानुसार नुकतेच हस्तांतरित करण्यात आले. त्यामुळे जेएनपीए हे देशातील पहिले खाजगीकरणातून लँडलॉर्ड बंदर झाले आहे.

त्याच बरोबर बंदरातील शॅलो वॉटर बर्थचे अपग्रेडेशन, सुसज्जीकरण आणि ऑपरेशन व देखभाल करण्यासाठी तसेच कोस्टल बर्थ पीपीपी मॉडेलवर चालविण्यासाठी सवलत करारावर स्वाक्षरी केली. शॅलो वॉटर बर्थचे नूतनीकरण आणि कोस्टल यानंतर बर्थचे व्यवस्थापन व संचालन जेएम बक्षी ग्रुपने स्थापन केलेल्या "न्हावा शेवा डिस्ट्रिब्युशन टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड" नावाच्या एसपीव्हीद्वारे केले जाणार आहे. जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी व उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी जेएम बक्षी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक ध्रुव कृष्ण कोटक आदी उपस्थित होते.

शॅलो वॉटर बर्थ आणि कोस्टल बर्थ आता पीपीपी टर्मिनल असतील, यासाठी जेएम बक्षी ग्रुपने यशस्वी बोली लावली होती. जेएम बक्षी ग्रुपने हे टर्मिनल अपग्रेड करणे, सुसज्ज करणे, ऑपरेट करणे, देखभाल करणे आणि ३० वर्षांच्या कराराच्या कालावधीच्या शेवटी हस्तांतरित करणे आवश्यक आहे. टर्मिनल ३ वर्षांच्या एकाच टप्प्यात विकसित केले जाईल. जेएनपीए द्वारा पायाभूत सुविधांचा विकास केला जाईल, अशी माहिती जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी दिली. आज जगातील अनेक प्रमुख बंदरे ही लँडलॉर्ड असून फक्त विपणन कार्य करीत आहेत. जेएनपीए सुद्धा आता अधिक सुव्यवस्थित पद्धतीने विपणन कार्य हाती घेणार आहे, प्राधिकरणाने सामान्य बंदर व्यवसायाचा विकास केला आहे.