Navi Mumbai International Airport Tendernama
मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मिशन मोडवर; दुसऱ्या धावपट्टीच्या इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमची चाचणी लवकरच

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. त्यामुळे विमानतळाच्या विविध चाचण्या घेण्यासाठी हवाई प्राधिकरणाच्यावतीने सुरुवात करण्यात आली आहे. एका धावपट्टीच्या यशस्वी चाचणीनंतर आता दुसऱ्या धावपट्टीच्या इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमच्या चाचणीसाठी प्राधिकरण सज्ज आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. 31 मार्च 2025 ही मुदत असल्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने आवश्यक त्या चाचण्या सुरू केल्या आहेत. सिग्नल यंत्रणा आणि इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमच्या चाचणीला विमानतळ प्राधिकरणाच्या वतीने 17 जुलै रोजी सुरुवात करण्यात आली. ही चाचणी दोन दिवस घेतली जाणार होती. मात्र दुसऱ्या दिवशी नवी मुंबईसह एमएमआरडीए क्षेत्रात धो धो पाऊस सुरू झाला. त्यामुळे ही दोन दिवसांची चाचणी पुढे ढकलण्यात आली. मात्र पावसाचा जोर कमी न झाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाने अनिश्चित काळासाठी चाचणी लांबणीवर टाकली. नंतर ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे दोन दिवस नवी मुंबईत पुन्हा विमानाने घिरट्या घातल्या आणि दोन दिवसांची ही चाचणी पार पडली.

नवी मुंबई विमानतळावर सध्या दोन धावपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आठ क्रमांकाच्या धावपट्टीची चाचणी यशस्वी झाली आहे. त्यानंतर आता 28 क्रमांकाच्या धावपट्टीची इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमची चाचणी घेण्यात येणार आहे. ही चाचणी बहुतेक या महिन्यांच्या अखेरपर्यंत किंवा सप्टेबर महिन्याच्या सुरुवातीला होण्याची शक्यता आहे. या चाचणीचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे. या धावपट्टीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर धावपट्टीवरील लायटिंग आणि रडार यंत्रणेची चाचणी होणार आहे. त्यानंतर व्यावसायिक विमानाच्या लँडिंगची चाचणी घेण्यात येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता अंतिम टप्प्यात आलेले आहे. त्यामुळे विमानतळाच्या विविध चाचण्या घेण्यासाठी हवाई प्राधिकरणाच्यावतीने सुरुवात करण्यात आली आहे, असे सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल यांनी स्पष्ट केले आहे.