मुंबई (Mumbai) : सुप्रसिद्ध भारतीय उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी खड्ड्यांच्या संदर्भांत एक ट्विट केले आहे. ते ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. पावसाळ्यात रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था होते आणि त्यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर परदेशात रस्त्यांवरचे खड्डे कसे बुजवले जातात यासंबंधीचा एक व्हिडीओ आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओसोबत त्यांनी एक कॅप्शन सुद्धा दिले आहे. यात ते म्हणतात, 'रस्त्यांच्या दुरुस्तीचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम भारतासाठी अतिशय आवश्यक आहे. बांधकाम क्षेत्रातील कंपन्यांनी याचे अनुकरण करणे गरजेचे आहे. रस्ते दुरुस्तीची ही पद्धत भारतात लवकर यायला हवी'. या व्हिडीओ मध्ये एका विशिष्ट पद्धतीने रस्त्यांवरचे खड्डे बुजवले जात आहेत, असे दाखविण्यात आले आहे.
याचअनुषंगाने आनंद महिंद्रा यांनी आणखी एक फोटो सुद्धा ट्विट केला आहे. त्यात त्यांनी एका रस्त्यावरील खड्ड्याचा फोटो शेअर केला आहे. 'भारतातले खड्डे एखाद्या लहानशा देशाच्या आकाराचे आहेत', असे गंमतीशीर कॅप्शन सुद्धा आनंद महिंद्रा यांनी या फोटोला दिले आहे. उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच महत्त्वाच्या विषयांवर ट्विट करत असतात.
रस्त्यांवरील खड्ड्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच खड्डयांमुळे अनेकदा अपघातासारख्या दुर्घटना सुद्धा घडतात. आपल्याकडे यंत्रणांकडून रस्त्यांवरचे खड्डे भरले जातात, पण ते तात्पुरते काम असते. त्यामुळे काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती जैसे थेच असते, त्यामुळे रस्त्यांच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केले जातात. यंत्रणांवर ताशेरेही ओढले जातात. पावसाळ्यात खड्यांमुळे आपल्या रस्त्यांची जी अवस्था होते, त्यासंबंधी आनंद महिंद्रा यांचे हे ट्विट अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.