मुंबई (Mumbai) : वंदे भारत (Vande Bharat) सुपरफास्ट एक्स्प्रेसला सतत गुरांची धडक होत असल्याने रेल्वे मार्गावर येणाऱ्या या गुरांच्या बंदोबस्तासाठी आता पश्चिम रेल्वेने ६२० किलोमीटर रेल्वे मार्गावर तारेचे कुंपण उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाकरिता पश्चिम रेल्वेकडून टेंडर मागवण्यात आले आहेत. या कुंपणासाठी २६४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी दिली.
पश्चिम रेल्वेवरील विविध योजनांची माहिती देण्यासाठी महाव्यवस्थापक अशोक कुमार मिश्र यांनी बुधवारी चर्चगेट येथील मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली, त्या वेळी ते बोलत होते. वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस सुरू झाल्यापासून अवघ्या दोन महिन्यांत चार अपघात झाले. अपघातामुळे प्रवासी सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. आता गुरांचा कायम बंदोबस्त करण्यासाठी पश्चिम रेल्वेने रेल्वे मार्गावर कुंपण घालण्याचा निर्णय घेतला आहे.
कुंपण स्टेनलेस स्टीलचे
मुंबई ते गुजरातदरम्यान ६२० किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर कुंपण घालण्यात येणार आहे. हे कुंपण स्टेनलेस स्टीलचे असणार आहे. जमिनीपासून १.५ मीटर उंचीवर ‘डब्ल्यू-बीम’ स्ट्रक्चर असणार आहे. या कुंपणामुळे रेल्वे मार्गावर गुरे आणि प्रवाशांनासुद्धा रूळ ओलांडता येणार नाही.