Cruise Truism  Tendernama
मुंबई

'या' क्षेत्रात विश्वगुरू बनण्याची भारताला संधी; केंद्रीय मंत्री...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : भारताच्या समुद्रकिनाऱ्यांप्रमाणेच देशांतर्गत नद्यांमध्येही क्रूझ पर्यटन लोकप्रिय करून भारतीय क्रूझ पर्यटन उद्योगाला जगात सर्वांत मोठा केला जाईल, असे केंद्रीय नौकानयन व जल वाहतूक मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितले.
पहिल्यावहिल्या अतुल्य भारत आंतराराष्ट्रीय क्रूझ कॉन्फरन्सचे उद्घाटन करताना ते बोलत होते. भारतीय क्रूझ उद्योगाला उज्वल भवितव्य असून त्यामुळे लाखो तरुणांना रोजगार मिळेल, असा विश्वासही यावेळी जाणकारांनी व्यक्त केला.

कोविडपूर्व काळात देशातील क्रूझ उद्योगाची वार्षिक वाढ ३५ टक्के होती, तेव्हा देशातील बंदरांमध्ये वर्षभरात साडेचारशे क्रूझ बोटी चार लाख प्रवाशांना घेऊन येत असत. आता क्रूझ उद्योगात हेरिटेज, वैद्यकीय, आयुर्वेद, कोस्टल, रीव्हर, टूरीस्ट अशी वेगवेगळी सर्किट येणार असल्या ने पुन्हा दहा वर्षांत हा उद्योग आठ ते दहा पट वाढेल, व प्रवासीसंख्या ४० लाखांपर्यंत जाईल, असा विश्वास नौकावाहतूक खात्याचे सचिव संजीव रंजन यांनी व्यक्त केला. तर देशातील क्रूझ उद्योग येत्या पाच वर्षांत वेगात वाढेल व जगातील पहिल्या पाच क्रूझ उद्योगांमध्ये त्याची गणना होईल, असे फीक्की चे ध्रूव कोटक म्हणाले.

परदेशातील क्रूझ टर्मिनसप्रमाणे सोयीसुविधा, कमीतकमी करजाळे, तसेच प्रवाशांसाठी इमिग्रेशन व कस्टम प्रक्रिया वेगवान या क्रूझ उद्योगाच्या भारताकडून अपेक्षा आहेत, त्यासंदर्भात उद्योगाने निवेदन द्यावे, त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल. गंगा व ब्रह्मपुत्र या मोठ्या नद्यांमधूनही क्रूझ पर्यटन सुरु केले जाईल, असे केंद्रीय नौकावाहतूक खात्याचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले.

देशातील साडेसात हजार किलोमीटरची समुद्रकिनारपट्टी व क्रूझ पर्यटनयोग्य साडेचौदा हजार किलोमीटरच्या मोठ्या नद्यांमध्ये क्रूझ पर्यटनासाठी सुविधा दिल्या जातील. आपला क्रूझ उद्योग जगात सर्वात मोठा करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. यासाठी आधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली जातील. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून येत्या पाच वर्षांत भारत हे क्रूझ टुरीझम मधील सर्वात जास्त आकर्षक ठिकाण होईल, असा विश्वास सोनोवाल यांनी व्यक्त केला.

मुंबईत १० लाख प्रवासी
भारतीय क्रूझपर्यटन उद्योगात मोठ्या प्रमाणावर संधी असून कोविडची भीती जात असल्याने व्यवसाय वृद्धीसाठी याहून दुसरी चांगली वेळ सापडणार नाही, असे मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा म्हणाले. सन २०२९ पर्यंत मुंबईसाठी पाच क्रूझ धक्क्यांची गरज असून मुंबई क्रूझ टर्मिनस जुलै २०२४ मध्ये पूर्ण होईल. त्यानंतर तेथे वर्षाला २०० जहाजे व दहा लाख प्रवासी हाताळले जातील. तर गोव्याचे टर्मिनस पूर्ण होण्यास अठरा महिने लागतील. अन्य बंदरांमध्येही साडेतीनशे मीटर लांबीचे दोन ते तीन धक्के उभारले जातील, असेही त्यांनी सांगितले.

तीन ट्रेनिंग अकादमी
या क्षेत्राला कुशल मनुष्यबळ मिळावे यासाठी गोवा, केरळ व पश्चिम बंगाल येथे क्रूझ ट्रेनिंग अकादमी स्थापन केल्या जातील. क्रूझ उद्योगाच्या वाढीसाठी नियुक्त केलेल्या उच्चस्तरीय समितीला यासंदर्भात सूचना देण्यासाठीच्या सल्लागार समितीवर देशी आणि विदेशी क्रूझ कंपन्यांना घेऊन त्यांच्याही सूचनांवर विचार केला जाईल, असेही सोनोवाल म्हणाले.

केळशी दीपगृहाचे उद्घाटन
यावेळी सोनोवाल यांच्याहस्ते मुंबई बंदरातील पीरपावच्या तिसऱ्या केमिकल बर्थचे दृकश्राव्य माध्यमातून उद्घाटन झाले. तसेच कोकणातील आंजर्ले-केळशी दीपगृहाचे उद्घाटनही अशाचप्रकारे करण्यात आले. त्यामुळे तेथे पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. स्थानिक मच्छिमारांच्या मागणीवरून दहा हजार चौरस मीटर जागेत हे दीपगृह उभारण्यात आले आहे. आतापर्यंत रायगडमधील नानवेल व रत्नागिरी जिल्ह्यातील टोकळेश्वर यामधील ८५ किलोमीटर लांब किनारपट्टीवर दीपगृह नव्हते.