MahaRERA Tendernama
मुंबई

घराचा ताबा वेळेत न मिळाल्यास विकसकाकडून मिळेल व्याज! वाचा सविस्तर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : विकसकाने निर्धारित वेळेत घराचा ताबा न दिल्यास आता विकसकाला गृहखरेदीदारास व्याज द्यावे लागणार आहे. याबाबतचा निर्णय महारेराच्या अपीलीय न्यायाधिकरणाने नुकताच एका प्रकरणात दिला आहे. यामुळे मुदतीत घराचा ताबा न देणाऱ्या विकसकांना आता चाप बसणार आहे.

अंधेरी परिसरात एका प्रकल्पात घर खरेदी केलेल्या व्यक्तीस विकसकाने दिलेल्या मुदतीमध्ये घराचा ताबा दिला नाही. घर खरेदीदाराने घरासाठी २० टक्के रक्कम म्हणून ८० लाख रुपये विकसकाला दिले होते. विकसकाने करारनामा करून खरेदीदारास २०१८ मध्ये घराचा ताबा देण्याचे कबूल केले होते; मात्र या मुदतीमध्ये घराचा ताबा न मिळाल्याने घर खरेदीदाराने महारेराकडे धाव घेतली. त्या वेळी महारेराने २०१९ मध्ये घर खरेदीदाराचा व्याजाचा दावा फेटाळला होता. घर खरेदीदाराने नोंदणीकृत करार केला नसल्याने महारेराने व्याज देण्यास नकार दिला होता. अखेर घर खरेदीदाराचे वकील गॉडफ्रे पिमेंटा यांनी महारेरा कायद्यामध्ये अशी तरतूद नसल्याने विकसकाने घर खरेदीदाराला घराच्या भरलेल्या रकमेवर व्याज देण्याची मागणी केली.

या सुनावणीत महाराष्ट्र रिअल इस्टेट अपीलेट ट्रिब्युनलने ऐतिहासिक निकाल दिला आहे. घर खरेदीदाराने विक्रीचा करार नोंदणीकृत केला नसला तरीही विकसकाने वेळेत घराचा ताबा न दिल्यास व्याज द्यावे, असा निकाल दिला आहे. तसेच विकसकाने घराचा ताबा देण्याबाबत कोणतेही डॉक्युमेंट घर खरेदीदारास दिले असेल ते मान्य करण्यात येईल. तसेच घराचा ताबा देण्याच्या तारखेपासून घर खरेदीदारास व्याज द्यावे लागणार असल्याचा निकालही अपीलीय न्यायाधिकरणाने दिला असल्याचे पिमेंटा यांनी सांगितले.