मुंबई (Mumbai) : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धनाने उपजिल्हा रुग्णालय झाले असून, त्यासाठी ३७ कोटी ८५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकीय आराखड्यास शासनाने मान्यता दिली आहे. नुकताच यासंदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे आता लवकरच टेंडर (Tender) प्रक्रिया पूर्ण करून अकोले उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे.
३० खाटांच्या अकोले ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी ३७ कोटी ८५ लाख रुपयांच्या अंदाजपत्रकीय आराखड्यास शासन निर्णयाने मान्यता मिळाली आहे. या उपजिल्हा रुग्णालयामुळे अकोले तालुका आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील.
या उपजिल्हा रुग्णालयात १०० बेडची सुसज्ज सुविधा राहणार आहे. या रुग्णालयात विविध तज्ज्ञ डॉक्टर्स येथे उपलब्ध राहतील. वैद्यकीय अधिकारी (डॉक्टरांची) तसेच अधिपरिचारका, परिचारक व कर्मचारी संख्याही अधिक असेल. सोनोग्राफी, एक्स रे, रक्त तपासणीसह इतर अनेक सुविधा या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध होणार आहेत.