Dharavi, Adani Tendernama
मुंबई

धारावी पुनर्विकास: पुनर्वसित व्यवसायास 5 वर्षांसाठी SGST परतावा; अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पुनर्विकसित धारावीमधील स्थानिक व्यवसायांना चालना देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक घटकांना राज्य वस्तू आणि सेवा कराचा परतावा (SGST) या सारखे फायदे मिळतील, अशी माहिती महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने (DRPPL) दिली आहे. प्रकल्पाच्या टेंडर अटींनुसार ही सवलत मिळणार आहे.

"पुनर्विकासामुळे धारावीतील व्यवसायांच्या अनौपचारिक स्वरूपात बदल होईल आणि त्यांना भारताच्या विकास कथेचा एक भाग बनण्याची संधी मिळेल. या संक्रमणास हातभार लावण्यासाठी, राज्य सरकारने राज्य वस्तू व सेवाकरात (SGST) परतावा देण्यासारखे कर लाभ देऊ केले आहेत. यामुळे धारावीतील सध्याच्या तसेच नवीन व्यवसायांना मजबूत पायाभरणी करता येईल आणि त्यांच्या नफ्यात वाढ होऊ शकेल. यामुळे व्यवसाय अधिक स्पर्धात्मक होऊन अनेक पटींनी वाढीच्या संधी मिळतील," असे डीआरपीपीएलने सांगितले.

नव्याने बांधलेल्या इमारतींना रहिवासी प्रमाणपत्र (OC) मिळाल्यानंतर कर सवलत लागू होणार आहे. प्रकल्पाच्या टेंडर अटींनुसार, रहिवासी प्रमाणपत्र जारी केल्याच्या तारखेपासून औद्योगिक आणि व्यावसायिक घटकांना राज्य सरकारच्या वित्त विभागाकडून धारावी पुनर्विकास प्रकल्प/ झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (DRP/SRA) द्वारे राज्य वस्तू व सेवाकराची पाच वर्षांसाठी परतफेड केली जाईल. पात्र औद्योगिक आणि व्यावसायिक घटकांना या परताव्यासाठी दावा करताना पुरावा म्हणून राज्य वस्तू व सेवाकर भरल्याचा तपशील द्यावा लागेल. धारावीमध्ये कपडे आणि चामड्याच्या वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या हजारो औद्योगिक आणि व्यावसायिक गाळ्यांचा समावेश होतो. त्यापैकी अनेक जगभरात विकल्या जाणाऱ्या मोठ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ब्रँडचे पुरवठादार आहेत, त्याची उलाढाल लाखो डॉलर्स इतकी आहे. ते त्यांच्या व्यवसायाचा स्थानिक आणि जागतिक पातळीवर विस्तार करण्यासाठी आणि त्यांना चालना देण्यासाठी व्यवसाय वाढीस उत्सुक आहेत.

धारावीचा केवळ अधिक चांगल्या जागेत पुनर्विकास करणे एवढेच नव्हे तर तेथील विविधतेतील एकात्मता राखून रहिवाशांसाठी दर्जेदार जीवनशैली विकसित  करणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. हा प्रकल्प एक असा मोठा बदल घडवून आणेल ज्यामुळे जगाच्या कोणत्याही भागात अशाच प्रकारच्या पुनर्विकास उपक्रमांसाठी एक आगळे उदाहरण प्रस्थापित होण्यास मदत होईल. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेड (DRPPL) हा महाराष्ट्र सरकार आणि अदानी समूह यांच्यातील संयुक्त उपक्रम म्हणून तयार करण्यात आलेला एक विशेष उद्देश प्रकल्प आहे. धारावीकरांना आधुनिक घरे उपलब्ध करून देऊन आणि त्यांच्यातील उद्योजकतेची अंगभूत भावना जपून त्यांच्या जीवनात परिवर्तन आणि सुधारणा करण्याचा DRPPL चा प्रयत्न आहे. मनुष्य केंद्रीभूत ठेवून केले जाणारे हे परिवर्तन रिकाम्या जागेची पुनर्बांधणी आणि सामुदायिक जगण्यातील आनंदाचा पुन्हा शोध घेणारे आहे, येथे वाहतूक सुविधा, वीज, पाणी आणि इंटरनेट या अत्याधुनिक अत्यावश्यक गोष्टींची जोडणी करणे आणि कोणत्याही निकषावर सर्वोत्कृष्ट ठरतील अशा नागरी सुविधांसह एक स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.