Jetty Tendernama
मुंबई

ठाण्यातील 'त्या' जेट्टींसाठी 100 कोटींची मान्यता; जलवाहतुकीचा नवा पर्याय उभारण्यासाठी...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे शहराला लाभलेला ३२ कि.मी. लांबीचा खाडी किनारा आणि रस्ते व अन्य प्रवासाच्या ताणावर जलवाहतुकीचा नवा पर्याय उभारण्यासाठी गेल्या काळापासून प्रयत्न सुरू आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत पहिल्या टप्प्यात नुकतीच १०० कोटी निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

ठाणे महापालिकेच्या पुढाकाराने शेजारील ६ महापालिकांना जोडणाऱ्या जलवाहतूक प्रकल्पाला केंद्र शासनाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात कोलशेत, भिवंडी काल्हेर, डोंबिवली, भाईंदर या ४ ठिकाणी जेट्टीची कामे सुरु आहेत. यातील ९८ कोटीच्या प्रकल्पाला केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेतून मान्यता मिळाल्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत कामे कार्यान्वित झाली आहेत. याठिकाणी रो-रो व प्रवासी जेट्टीच्या कामाला आवश्यक पर्यावरण खात्याच्या परवानग्या मिळाल्या असून हे काम बफर झोन मध्ये असल्याने उच्च न्यायालयाची परवानगी मिळणे बाकी आहे. टेंडर प्रक्रियेचे काम पूर्ण झालेली आहे, परवानगी मिळताच कोलशेत व खाडी पलीकडे काल्हेर येथे याचे काम सुरू होणार आहे.

केंद्र सरकारच्या सागरमाला व राज्य सरकारच्या मदतीने ५०-५० टक्के अनुदानाने घोडबंदर जेट्टीचे काम सन २०१८ मध्ये सुरू करण्यात आले. एल टाईप मध्ये ही जेट्टी विकसित केलेली आहे. तेव्हा या जेटीवरून प्रवासी बोट व पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्ट्स, फेरीबोट सुरू करा अशी मागणी आहे. नुकतीच कोलशेत येथील जेट्टीची पाहणी खा. राजन विचारे यांनी केली. या कोलशेत जेट्टीसाठी ३६ कोटीची मान्यता मिळाली आहे. यावेळी महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता अजित मोहिते, उपअभियंता प्रशांत सानप, कॅप्टन सुरज नाईक आदी उपस्थित होते.