Steel Girder Bridge Tendernama
मुंबई

डहाणू-जव्हार-नाशिक मार्गावरील तीन पुलांना मंजुरी मिळाल्याने...

टेंडरनामा ब्युरो

कासा : डहाणू-जव्हार-नाशिक मार्गावरील पाटबंधारे विभागाच्या अख्यात्यारीत तीन पूल आहेत. रानशेत, सारणी व चारोटी वळणावरील हे पूल जुने व धोकादायक स्वरूपाचे असल्याने ते कधीही पडण्याची भीती व्यक्त होत आहे. अखेर या राज्य मार्गावरील कालव्यांवरील पुलांच्या कामास मंजुरी मिळाली असून, लवकरच यांच्या कामास सुरुवात होणार आहे. त्यामुळे हा प्रवास सुखकर होणार आहे.

सारणी वळणावरील पुलावर अनेक अपघात झाले आहेत. पुलाचे कठडे तुटले आहेत. या जुन्या पुलावरून अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. हा मार्ग डहाणू-नाशिक असल्याने व अदानी इलेक्ट्रिकची राख घेऊन जाणारी अनेक मोठी वाहने याच मार्गावरून ये-जा करत असतात. त्यामुळे मोठा अपघात घडू नये, यासाठी हे कालव्यावरील पूल नवीन करावेत. यासाठी ग्रामस्थ व वाहनचालक मागणी करत होते. या पुलाखालून पाटबंधारे विभागाचे पाट वाहत असून ते जीर्ण झाले असून अपघातांची शक्यता नाकारता येत नाही. सध्या डहाणू ते तलवाडापर्यंतचा रस्ता रुंद आणि डांबरी झाला आहे. त्यामुळे वाहने वेगाने जात आहेत. येथील अनेक पूल जीर्ण झालेत ते नवीन बांधावेत, यासाठी नागरिक मागणी करीत होते.

डहाणू-नाशिक मार्गावरील कालव्यावरील पूल अतिशय जुने व पडण्याच्या अवस्थेत आहेत. हे पूल नवीन करावेत, यासाठी अनेक वेळा बांधकाम विभागाकडे मागणी केली होती. अखेर त्या कामांना मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ते काम सुरू करून आणखी काही पुलदेखील जुने झालेत, तेसुद्धा नवीन करावेत.

- पिंटू गहला, उपसभापती, डहाणू पंचायत समिती

रानशेत, सारणी व चारोटी या तिन्ही कालव्यावरील पुलांची पाहणी करून अहवाल सादर केला आहे. त्याचे टेंडर काढले आहे. काम मंजूर झाले आहे. यासाठी दोन कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. दिवाळीत या कामास सुरुवात होईल.

- अजय जाधव, उपअभियंता, बांधकाम विभाग, डहाणू