tमुंबई (Mumbai) : 'अटल सेतू' आणि 'जेएनपीए' आता शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने थेट पुणे, सातारा, सोलापूरला जोडले जाणार आहे. तब्बल 130 किलोमीटर लांबीचा हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग चौक-पुणे-शिवारे जंक्शन असा असेल. नव्या महामार्गामुळे मुंबई ते पुणे प्रवासासाठी सध्या लागणाऱ्या वेळेत सव्वा ते दीड तासांची बचत होणार आहे. तसेच अटल सेतुवरुन थेट सोलापूर आणि साताऱ्यासाठी रस्ता उपलब्ध होणार आहे. आगामी काळात हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे. या महामार्गासाठी सुमारे 17 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी होताना दिसते. याशिवाय, घाट परिसरात अनेकदा वाहनांच्या रांगा लागून प्रवासी तासनतास अडकून बसतात. एक्स्प्रेस वे लगत वाढलेले नागरीकरण आणि औद्योगिकरण यामुळे या महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या वाढत चालली आहे. यासाठी लोणावळा परिसरात मिसिंग लेन तयार केली जात आहे. मुंबई-पुणे प्रवासाचा कालावधी कमी करणाऱ्या या मिसिंग लेनचे काम अंतिम टप्प्यात आहे. मात्र, भविष्यात ही सुविधाही अपुरी पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अटल सेतू शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने सोलापूर आणि साताऱ्याला जोडण्यात आल्यास मोठा फायदा होऊ शकतो.
नव्या प्रस्तावित महामार्गाद्वारे अटल सेतू आणि जेएनपीटी थेट पुणे, सातारा, सोलापूरला जोडले जाईल. तब्बल 130 किलोमीटर लांबीचा हा शीघ्रसंचार द्रुतगती महामार्ग चौक-पुणे-शिवारे जंक्शन असा असेल. या मार्गावर वेगवान प्रवासासाठी एकूण 8 लेन असतील. या रस्त्याच्या बांधकामासाठी तब्बल 17 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून या महामार्गाची रुपरेषा तयार केली जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच अटल सेतूला जोडणाऱ्या आणखी एका महामार्गाची घोषणा केली होती. त्यानुसार अटल सेतूवरुन उतरल्यानंतर 14 लेन असणारा रस्ता तयार केला जाणार आहे. हा महामार्ग बंगळूरु आणि छत्रपती संभाजीनगरला जोडला जाणार आहे. याशिवाय, हा रस्ता पुणे रिंग रोडशी कनेक्ट केला जाईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली होती.