मुंबई (Mumbai) : केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडोरच्या मार्गिकेचा अंतिम आराखडा (डीपीआर) सल्लागार कंपनीकडून पंधरा जुलैपर्यंत भारतीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला सादर करण्यात येणार आहे. त्याची कॉर्पोरेशनकडून छाननी करून हा अहवाल ऑगस्ट महिन्यात रेल्वे मंत्रालयाला सादर केला जाणार आहे, अशी माहिती कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे हा प्रकल्प मार्गी लागण्यासाठी आणखी एक पाऊल पुढे पडण्याची चिन्हे निर्माण झाले आहे.
भारतीय हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने देशभरात आठ ठिकाणी बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये मुंबई-नागपूर आणि मुंबई-पुणे-हैदराबाद असे दोन प्रकल्प आहेत. त्यापैकी हा एक प्रकल्प आहे. ही ट्रेन ताशी २५० ते ३२० या वेगाने धावणार आहे. मुंबई ते हैदराबाद असा सुमारे ७११ किलोमीटरचे अंतर आहे. हे अंतर ही ट्रेन साडेतीन तासात कापणार आहे. या ट्रेनच्या मार्गावर पुणे, सोलापूर, पंढरपूर असे मोजके थांबे असणार आहेत. या रेल्वेसाठी स्वतंत्र ट्रक टाकण्यात येणार आहे.
हा रेल्वेमार्ग ‘पीएमआरडीए’च्या हद्दीतील लोणावळा, देहू, सासवड या हद्दीतून जातो. मात्र, ‘पीएमआरडी’च्या विकास आराखड्यात हा मार्ग प्रस्तावित केला नव्हता. तो समाविष्ट करावा, यासाठी हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने यापूर्वी ‘पीएमआरडीए’ला पत्र दिले होते, त्याची दखल घेऊन ‘पीएमआरडीए’ने प्रस्तावित विकास आराखड्यात हा मार्ग दर्शविला आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या मार्गातील मोठी अडचण दूर झाली. परंतु, हाच मार्ग पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांमधील फुरसुंगी आणि लोहगावच्या हद्दीतूनही जातो.
फुरसुंगी येथे महापालिकेकडून दोन नगररचना योजना (टीपी स्कीम) प्रस्तावित केल्या असून, त्यापैकी एका नगररचना योजनेचे प्रारूप महापालिकेने जाहीर केले आहे. मात्र, फुरसुंगीतील दुसऱ्या नगररचना योजनेचे काम अद्याप सुरू आहे. ही दोन गावे वगळता उर्वरित गावांचा विकास आराखड्याचे काम महापालिकेकडून अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, नगररचना योजना आणि प्रस्तावित विकास आराखड्यात महापालिकेकडून हा रेल्वे मार्ग दर्शविलेला नाही. महापालिकेने त्यास मान्यता दर्शविल्यानंतर सल्लागार कंपनीकडून या रेल्वेच्या मार्गिकेच्या आराखड्याचे काम सुरू असलेले काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील महिन्यात १५ जुलैपर्यंत अंतिम आराखडा कॉर्पोरेशनकडे सादर करण्यात येणार आहे. कॉर्पोरेशनकडून त्यांची छाननी करून ऑगस्टमध्ये तो रेल्वे मंत्रालयाकडे सादर करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
प्रकल्पाच्या ठळक बाबी
- मुंबई-हैदराबाद मार्गाची लांबी ७११ किमी
- प्रकल्पाचा अंदाजे खर्च १४,००० करोड
- रेल्वे ताशी २२० ते ३५० किलोमीटर वेगाने धावणार
- प्रवासी क्षमता ७५०
- भूकंप झाल्यास आपोआप ब्रेकिंग सिस्टिम, तातडीने भूकंप शोध आणि अलार्म सिस्टम (यूपीएडीएएस)
- काही मार्ग एलिव्हेटेड, तर काही मार्ग भुयारी