Navi Mumbai Metro Tendernama
मुंबई

Good News! नवी मुंबई मेट्रोचा मुहूर्त ठरला! वाचा सविस्तर...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : गेल्या दहा वर्षांपासून रखडलेली नवी मुंबई मेट्रो (Navi Mumbai Metro) आता लवकरच धावण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर मेट्रो सेवा सुरू होणार आहे. प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या सिडकोला (CIDCO) मिळाल्या आहेत. परवानग्या मिळाल्याने सिडकोकडून तयारीला वेग आला आहे.

सध्या राज्यसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील प्रमुख नेते या निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे उद्घाटनासाठी संबंधित मंत्र्यांच्या तारखा उपलब्ध होत नसल्याने मेट्रो प्रवास लांबणीवर पडला आहे. मात्र आता राज्यसभा निवडणुकीनंतर लगेचच राज्य सरकारच्या वतीने मेट्रोचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

विशेषत: पेंधर ते बेलापूर मार्गावरील पेंधर ते खारघर (सेंट्रल पार्क) या पाच किमी अंतरावर मेट्रो सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या सिडकोने यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले रेल्वे सुरक्षा मंडळाकडून सुद्धा ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार सिडकोनेही तयारी पूर्ण केली आहे.

नवी मुंबईतील दळणवळण व्यवस्था अधिक गतिमान व्हावी यासाठी सिडकोकडून पेंधर ते बेलापूरदरम्यान 2011 साली मेट्रोच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र त्यानंतर सातत्याने मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीमध्ये अडथळे येत गेले. त्यामुळे मेट्रो प्रकल्प रखडला, त्याच्या खर्चात देखील वाढ झाली. पुढे या प्रकल्पाची जबाबदारी महामेट्रोवर सोपवण्यात आली. महामेट्रोने जबाबदारी घेतल्यानंतर अवघ्या एका वर्षात मेट्रो प्रकल्प उभारण्यात आला. प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व चाचण्या सिडकोने पूर्ण केल्या असून, त्यांना रेल्वे सुरक्षा मंडळाकडून ना-हरकत प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.

मेट्रोच्या प्रवासी वाहतुकीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या सिडकोला मिळाल्या आहेत. मात्र आता उद्घाटनासाठी मेट्रोचा प्रवास थांबला आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर लगेचच उद्घाटन करण्यात येणार असून, नवी मुंबईत मेट्रो धावणार आहे. उद्घाटनासाठी मंत्र्यांची तारीख मिळावी यासाठी सिडकोकडून पाठपुरावा देखील सुरू आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता मेट्रोला मुहूर्त लागण्याची शक्यता आहे.