CSMT Tendernama
मुंबई

Good News! CSMT वरील 'या' फलाटांचा विस्तार; प्रतिक्षा यादी कमी...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सीएसएमटी स्टेशनवर (CSMT) २४ डब्यांची एक्स्प्रेस उभी राहावी यासाठी फलाटांची लांबी वाढविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने (Central Railway) घेतला आहे. फलाट क्रमांक १० ते १३ क्रमांकाच्या फलाटाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. यावर ६३ कोटींचा खर्च केला जाणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी आणि एलटीटी ही दोन महत्त्वाची टर्मिनस आहेत. सीएसएमटी स्थानकातून लोकल आणि लांबपल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक होते, तर एलटीटी येथून केवळ लांब पल्ल्याच्या गाड्या धावतात. एलटीटी येथून दररोज लांब पल्ल्याच्या ११८, तर सीएसएमटी येथून १०० गाड्या धावतात. सीएसएमटीच्या फलाट क्रमांक १०, ११ वरून १३ डब्यांच्या, तर फलाट क्रमांक १२ आणि १३ वरून १७ डब्यांच्या गाड्या धावतात. फलाट क्रमांक १४ ते १८ वरून २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस धावतात. २४ डब्यांच्या रेल्वेसाठी केवळ पाच फलाट उपलब्ध असल्याने आता फलाट क्रमांक १० ते १३ क्रमांकाच्या फलाटाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे.

सीएसएमटीवरील फलाट क्रमांक १० ते १३ चे विस्तारीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गाडीला आणखी सात डबे जोडता येतील. या चार फलाटांवरून दररोज १० गाड्यांच्या फेऱ्यांचे नियोजन करता येईल. एका गाडीतून साधारण पाच हजार प्रवाशांचा फायदा होईल, तसेच प्रतीक्षा यादीदेखील कमी होईल. पर्यायाने प्रवासी वाढल्याने रेल्वेच्या महसुलातही वाढ होईल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.

सध्या चार फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम मंजूर झाले आहे. यासाठी २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात ६३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. या कामाचा पहिला टप्पा मार्च २०२३ आणि दुसरा टप्पा मार्च २०२४ मध्ये पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.