Tender Tendernama
मुंबई

ठाणे जिल्ह्यातील वनाधिकाऱ्यांचा प्रताप; लाखोंचे काम टेंडरविना

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) जिल्ह्यातील वन विभागाच्या टोकावडे दक्षिण रेंजमध्ये मुरबाड तालुक्यातील धसई गावात वन अधिकाऱ्यांचा प्रताप उघड झाला आहे. टोकावडे दक्षिण या वन विभागाच्या रेंज ऑफिसरने कोणतेही लेखी आदेश न देता ठेकेदाराकडून लाखोंचे चेन लिंक फेन्सिंगचे काम विना टेंडर करून घेतले आहे. कोणतीही टेंडर प्रक्रिया वा खरेदी प्रक्रिया न राबवता ठेकेदारास हे काम करण्यास भाग पाडल्याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. आता यावरुन टीकेची झोड सुरु होताच रेंज ऑफिसरकडून उडवा-उडवीची उत्तरे दिली जात आहेत.

ठाणे वनविभागातील वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे (टोकावडे दक्षिण) यांनी धसई येथील निवासस्थानाभोवती संरक्षण कुंपणाचे काम टेंडर प्रक्रियेविनाच केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हे काम ठेकेदाराकडून जबरदस्तीने करून घेतले आहे. यासंदर्भात ठेकेदारांशी संपर्क साधला असता त्यांनी हे काम कुठलीही टेंडर प्रक्रिया न राबवता व कुठलेही कार्यारंभ आदेश न देता वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर मांजरे यांनी करायला भाग पाडल्याचे सांगितले. माझ्यावर विश्वास नाही का ? असे म्हणून तब्बल 24 लाख रुपये खर्चाचे काम ठेकेदारास करण्यास लावण्यात आले असून आता अडचणी वाढताच अधिकार्‍यांनी या प्रकारातून अंग काढून घेण्याचा प्रयत्न सुरु केल्याचा आरोप आहे.

झालेल्या कामानंतर होत असलेल्या टीकेनंतर वन विभागाच्या अधिकार्‍यांसह कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे. वास्तविक नियमानुसार, कोणत्याही कामापूर्वी ई-टेंडर प्रक्रिया होणे गरजेचे असताना वनविभागाच्या अधिकार्‍यांनी मात्र नियम धाब्यावर बसवून स्वतः ठेका दिल्याप्रमाणे ठेकेदार यांच्याकडून काम करून घेतले आहे. मी वारंवार ठेकेदाराला काम करू नका असे, म्हणत होतो तरी ते काम पूर्ण करण्यात आलेले आहे, असा हास्यास्पद दावा संबंधित अधिकार्‍याने केला आहे. आता हे काम करण्यात आल्यानंतर मात्र ठेकेदाराची आर्थिक अडचण वाढली आहे. दरम्यान, याच वनपरिक्षेत्र अधिकार्‍याने २०२० मध्ये मजुरी वाटपात अफरातफर केल्याबाबत सध्या चौकशी सुरू आहे.