BMC Tendernama
मुंबई

BMC आयुक्तांचा मोठा निर्णय; 1000 कोटींची वादग्रस्त 3 टेंडर्स रद्द

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेतील (BMC) सत्ताधारी शिवसेनेला (Shivsena) लक्ष्य करण्यासाठी भाजपकडून (BJP) सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होऊ लागल्याने महापालिका आयुक्तांनी वादग्रस्त टनेल लाँड्री, प्राण्यांचे पिंजरे, ट्रेंचेसचे टेंडर रद्द केले आहे.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी परेल येथील विद्युत धुलाई केंद्राचा वापर केला जातो. पालिकेच्या मालकीच्या या केंद्राची क्षमता कमी असल्याने रुग्णांचे कपडे उशिरा धुवून मिळत होते. सध्या याठिकाणी ५० टक्केच कपडे धुतले जातात. यामुळे रुग्णांना वेळेवर कपडे मिळत नव्हते. यासाठी महानगरपालिका प्रशासनाने क्षयरोग रुग्णालयात अत्याधुनिक टनेल लाँड्री उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयात घोटाळा झाल्याचा संशय भाजप आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला होता. तरीही प्रशासनाकडून सारवासारव करीत हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांनी हे १६० कोटींचे कंत्राट रद्द करावे आणि संपूर्ण टेंडर प्रक्रियेची निःपक्षप तपासणी करीत दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार साटम यांनी लेखी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आले आहे.

भायखळा येथील राणीबागेचे नूतनीकरण केले जात आहे. प्राणी आणि पक्षांसाठी नवे पिंजरे बनवले जात आहेत. दुर्मिळ प्रजातींचे प्राणी आणि इतर विकास कामे यासाठी टेंडर काढण्यात आले होते. 185 कोटींचे हे कंत्राट होते. त्यात नंतर 106 कोटींची वाढ होऊन ते 290 कोटींचे कंत्राट झाले होते. या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भाजपाचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी महापालिका आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आले.

नागरिकांना पाणी, लाईट, केबल, इंटरनेट आदी सोयी सुविधा देण्यासाठी केबल आणि पाईपलाईनचे जाळे पसरवले जाते. त्यासाठी रस्त्यावर छोटे खड्डे करावे लागतात. नंतर हे खड्डे बुजवले जातात. यासाठी महापालिकेने 570 कोटींचे टेंडर काढले होते. भाजपचे तत्कालीन नगरसेवक विनोद मिश्रा यांनी याबाबत तक्रार केली. यानंतर हे टेंडर रद्द करण्यात आले.

महानगरपालिका तसेच स्थायी समितीसह विविध समित्यांनी महानगरपालिकेच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमध्ये कोणताही फेरफार अथवा संबंधित प्रस्ताव रद्द करण्याबाबतचे निर्णय महानगरपालिका अस्तित्वात येईपर्यंत प्रशासक, बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी घेणे उचित ठरणार नाही. विरोधकांच्या दबावाला बळी पडू नका. पालिका सभागृह आणि स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयात बदल केले जात आहेत. हा सभागृहाचा अवमान आहे, अशी आठवण माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्राद्वारे आयुक्तांना करून दिली आहे.

दरम्यान, टनेल लाँड्री क्षयरोग रुग्णालयाच्या जागेत उभारली जाणार होती. 12 टक्के रक्कम वाढीव दाखवून टेंडर दिले जात होते. राणीबागेतले टेंडरही वाढीव होते. अधिकाऱ्यांनी पालिकेची लूट करण्यासाठी ही टेंडर फ्रेम केली होती. त्यामुळे ही टेंडर रद्द करण्यात आली. यावर आम्ही स्थायी समिती आणि सभागृहात विरोध केला मात्र सत्ताधारी शिवसेनेने बहुमतावर प्रस्ताव मंजूर केले. पालिका प्रशासकाच्या ही लूट लक्षात आल्याने त्यांनी ही टेंडर रद्द केली अशी प्रतिक्रिया भाजपचे पालिकेतील माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.