Eknath Shinde Tendernama
मुंबई

Eknath Shinde : नवी मुंबईच असणार महाराष्ट्राचे Grouth Center; असे का म्हणाले CM शिंदे?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवी मुंबईमध्ये सिडकोच्या (CIDCO Navi Mumbai) माध्यमातून उभे राहात असलेले मेट्रो, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai International Airport) हे प्रकल्प गेम चेंजर ठरणार असल्याचे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी काढले.

सिडकोतर्फे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल, खारघर-तुर्भे जोड मार्ग आणि उलवे किनारी मार्ग या प्रकल्पांचे भूमिपूजन, त्याचप्रमाणे भूमिपूत्र भवन आणि प्रवासी जलवाहतूक टर्मिनस नेरुळ या नागरी हिताच्या प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे वर्षा निवासस्थान येथून संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. या विकास प्रकल्पांचे एकूण मूल्य सुमारे 5 हजार कोटी रुपये आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, नवी मुंबईमध्ये सिडकोच्या माध्यमातून उत्तम प्रकारे विकासकामे होत असून नवी मुंबईमध्ये उभी राहणारी विकास केंद्रे (ग्रोथ सेंटर) ही राज्याकरिता अश्वशक्ती आहे. राज्य शासनाने अटल सेतू सारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील कनेक्टिव्हिटी समृद्ध करण्यावर भर दिला आहे. शासनाच्या या उद्दिष्टाला हातभार लावून सिडकोनेही परिवहनाचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत.

सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले की, सिडकोच्या उद्घाटन व भूमिपूजन होत असलेल्या प्रकल्पांचे सादरीकरण करून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुलामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाकडे जाण्याकरिता व तेथून येण्याकरिता थेट प्रवेश मार्ग उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास देखील थेट जोडणी मिळणार आहे. खारघर-तुर्भे जोड मार्ग हा 5.4 कि.मी. लांबीचा मार्ग असून या मार्गाद्वारे तुर्भे आणि खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्क दरम्यान थेट कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे.

यावेळी क्रीडा व बंदरे मंत्री संजय बनसोडे, आमदार रमेश पाटील, गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, मंदा म्हात्रे, माजी खासदार संजीव नाईक, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले उपस्थित होते.