मुंबई (Mumbai) : वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील 2 बॅरेजेसना मान्यता देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा होणार असून 2200 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली येणार आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा गावाजवळ अडाण नदीवर हा बॅरेज बांधण्यात येत असून यामुळे बोरव्हा, पोटी, पारवा आणि लखमापूर या 4 गावातील 900 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यासाठी 162 कोटी 43 लाख एवढा खर्च येणार आहे.
याच तालुक्यातील घोटा शिवणी बॅरेज हा देखील अडाण नदीवरच बांधण्यात येत असून त्यामुळे जिल्ह्यातील घोटा, शिवणी, पोघात, उंबरडोह, गणेशपूर, बहाद्दरपूर या 6 गावातील 1394 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यासाठी 234 कोटी 13 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. अशा रितीने अमरावती भागातील पाटबंधारे विकासाचा अनुशेष दूर होण्यास मदत होणार आहे.