Eknath Shinde, Devendra Fadnavis, Ajit Pawar Tendernama
मुंबई

Eknath Shinde : मुंबईतील बहुप्रतीक्षित सदनिकांचे वाटप अखेर सुरू; 'त्या' कर्मचाऱ्यांसाठी Good News

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वांद्रे पूर्व येथील शासकीय इमारतीतील सदनिकांच्या चाव्या आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते देण्यात आल्या. या सदनिका लॉटरी पद्धतीने देण्यात येत असून, ६ शासकीय कर्मचाऱ्यांना सह्याद्री अतिथीगृह येथे प्रतिकात्मकरित्या या चाव्या देण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) उपस्थित होते.

वांद्रे येथील शासकीय जमिनीवर ९६ एकर जागेत १९५८ ते १९७३ च्या दरम्यान शासकीय वसाहत बांधण्यात आलेली आहे. वांद्रे शासकीय वसाहतीमध्ये, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३, व वर्ग-४ नुसार ३७० इमारतीमध्ये एकूण ४७८२ सदनिका आहेत.

वांद्रे वसाहतीमधील एकूण ३७० इमारतींपैकी धोकादायक असलेल्या ६८ इमारती पाडण्यात आलेल्या असून, या इमारतींच्या जागेवर सद्यस्थितीत टप्पा-१ अंतर्गत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरिता इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सध्या चतुर्थ श्रेणीकरीता एकूण २०१२ निवासस्थानांचे बांधकाम सुरू आहे, ही निवासस्थाने टप्याटप्याने उपलब्ध होणार आहेत.

यापैकी पहिल्या टप्यात इमारत क्र.सी-१, ए-१ व बी-२ तसेच बी-१ इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्यामध्ये एकूण ६६० निवासस्थाने आहेत. त्यातील बी-१ या इमारतीमधील १२८ सदनिका सावित्रीबाई फुले वसतिगृहासाठी देण्याचे निश्चित झाले आहे.

शासकीय वसाहत वांद्रे पूर्व येथील चतुर्थ श्रेणी इमारत क्र.१,४,६,७ व १० ह्या इमारतीमधील एकूण ५०५ सदनिकाधारकापैकी ४३५ सदनिकाधारक लॉटरी प्रक्रियेमध्ये उपस्थित होते. अशाप्रकारे जुन्या इमारतींमधून नवीन इमारतीत स्थलांतरित करण्याबाबतची लॉटरी प्रक्रिया पार पडली.

यावेळी प्रभा जाधव, मनीषा मोरे, सुरेखा जाधव, सचिन कोळवणकर, जितेंद्र नाईक, प्रमोद कासले या शासकीय कर्मचाऱ्यांना सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या. कार्यक्रमास अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर पाटणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रमोद बनगोसावी आदींची उपस्थिती होती.