मुंबई (Mumbai) : उपनगरीय रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर पडणारा ताण कमी करून मुंबईकरांचा प्रवास अधिक गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने विविध मेट्रो प्रकल्पाना मान्यता दिली आहे. शहर आणि उपनगरांमध्ये मेट्रो प्रकल्पांचे काम वेगाने सुरु असले तरी अद्यापही काही मेट्रो प्रकल्पांच्या कारशेडचा प्रश्न निकाली निघालेला नाही. त्यामुळे प्रकल्पाची कामे झाल्यानंतरही केवळ कारशेडमुळे प्रकल्पांची रखडपट्टी होणार आहे.
वाहतूक गतिमान करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत विविध मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यापैकी अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व या मेट्रो 7 आणि दहिसर पश्चिम ते अंधेरी पश्चिम या मेट्रो 2 ए प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या दोन्ही मार्गावर पहिल्या टप्यातील मेट्रो लवकरच धावणार आहे. या मार्गांसाठी चारकोप येथे कारशेड उभारण्यात आले आहे. पहिल्या टप्यातील मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर पुढील तीन ते चार महिन्यात या दोन्ही मेट्रो मार्गांचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. मात्र मेट्रो ७ साठी प्राधिकरणाने दहिसर येथील भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या जागेवरील प्रस्तावित कारशेड वगळून राई मुर्धे येथील उपलब्ध असलेल्या अतिरिक्त जागेवर मेट्रो 7, अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हा मेट्रो 7 अ आणि दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर हा मेट्रो 9 या मेट्रो मार्गांसाठी कारशेड उभारण्याचा निर्णय एमएमआरडीए प्राधिकरणाने नुकताच घेतला आहे. या मार्गांचे काम सुरु झाले असले तरी कारशेडचे काम सुरु झाले नसल्याने मेट्रो प्रवाशांच्या सेवेत येण्यास वेळ लागणार आहे.
कुलाबा-वांद्रे सिप्झ या भुयारी मेट्रो 3 प्रकल्पाचे काम मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशन मर्यादित कंपनीमार्फत करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे भुयारीकरणाचे काम 97 टक्के पूर्ण झाले आहे. तर स्थानकांची कामे 70 टक्के पूर्ण झाली आहेत. या मार्गाचे कारशेड आरेमध्ये प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र पर्यावरणवादी संघटनांनी आक्षेप घेतल्याने आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र येथील जमिनीचा वाद न्यायालयात गेल्याने अद्यापही कारशेडचा प्रश्न कायम आहे. तसेच विक्रोळी ते लोखंडवाला या मेट्रो 6 मार्गाचे कारशेडही कांजूरमार्गमध्ये उभारण्यात येणार होते. या मार्गाचे काम वेगाने सुरु असताना मात्र कारशेड अभावी या मार्गाचा वेगही मंदावणार आहे.
वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो 4 मार्गाचे काम सुरु असले तरी या मार्गाच्या प्रस्तावित मोघरपाडा येथील कारशेडचे काम सुरु झालेले नाही. त्यामुळे या मार्गाचीही रखडपट्टी होण्याची शक्यता आहे. तसेच ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्ग 5 प्रकल्पाकरीता प्रस्तावित मेट्रो कार डेपोचे बांधकाम कोनगाव एमआयडीसी येथे करण्याऐवजी मौजे कशेळी येथे करण्यात येणार आहे. या मार्गाच्या ठाणे ते भिवंडी पहिल्या टप्यातील कामे मोठ्या प्रमाणात झाली असली तरी कारशेडचे काम सुरु झाले नसल्याने या मार्गाचा प्रवासही रखडणार आहे.
दरम्यान, मंडाले, राई मुर्धे येथील कारशेड पूर्ण झाल्यानंतर पश्चिम उपनगरातील सर्व मेट्रो जाळ्यास कारशेड उपलब्ध होणार आहेत. तसेच पूर्व उपनगरातील मेट्रो जाळ्यास मोघरपाडा व कांजूरमार्ग येथील जागेवर कारशेड झाल्यानंतर गती येणार आहे.