ED Tendernama
मुंबई

जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यात ईडीचे मुंबईतील ठेकेदारांवर छापे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या जम्बो कोविड सेंटर घोटाळ्या प्रकरणी ईडीने मुंबईत छापेमारी केली. ईडीच्या कारवाईत रोमीन छेडा, राहुल गोम्स, रोमेल ग्रुपचे बिल्डर ज्यूड रोमेल आणि डॉमनिक रोमेल या ठेकेदार रडारवर होते. कोविड जम्बो सेंटर घोटाळ्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित चौकशीचा भाग म्हणून या ठेकेदारांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीने छापे टाकले.

ईडीने छापे टाकलेल्यांमध्ये घाटकोपर येथील रोमीन छेडा या ठेकेदाराचा समावेश आहे, ज्यांना ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे कंत्राट देण्यात आले होते. छेडा याने यूपीस्थित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत हे काम करून घेतल्याचा संशय आहे. कोविड काळात ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी त्यांना सुमारे 300 कोटी रुपये दिले गेल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले. निकृष्ट उपकरणे पुरवल्याचा आरोप असून, त्याचा तपास सुरू असताना ठेकेदाराच्या फायलींवर महापालिका अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली आणि त्याला भरघोस मोबदला दिला गेला, असेही सूत्रांनी सांगितले. छेडा हा हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी आहे, ही कंपनी अलाहाबाद, यूपी येथे आहे.

दुसरा प्रमुख ठेकेदार राहुल गोम्स याची ओक्स मॅनेजमेंट कन्सल्टंसी प्रा. लिमिटेड ही कंपनी आहे, त्याने दहिसर, वरळी, एमएमआरडीए आणि मुलूंड आणि बीकेसी येथील कोविड सेंटर रुग्णालयामध्ये बेड, पंखे, तंबू आणि इतर सुविधा पुरवल्या आहेत. ओक्स मॅनेजमेंट कंपनीला मुंबई मनपाने सुमारे 40 कोटी रुपये दिले होते. आता त्याची बारकाईने तपासणी केली जात आहे. विलेपार्ले स्थित रोमेल ग्रुपचे डेव्हलपर ज्युड रोमेल आणि डॉमिनिक रोमेल यांना जंबो सेंटर युनेस्को गोरेगावसह मेक शिफ्ट रुग्णालये उभारण्यासाठी त्यांच्या संस्थेला 13 कोटी रुपये मिळाले होते. ईडीने त्यांच्या घरातून 60 लाखांची रोकड जप्त केली आहे. रोमेल बंधूंचे आयएएस अधिकारी संजीव जयस्वाल यांच्याशी संबंध असल्याचा संशय ईडीकडून व्यक्त करण्यात आला होता.