Devendra Fadnavis Tendernama
मुंबई

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेसाठी 900 कोटींची तरतूद; नगरपर्यंत विस्तार करणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : देशात मोदी सरकारच्या स्थापनेनंतरच कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळाली. या प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात ९०० कोटींची तरतूद केली असून, कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग आता कोणीही थांबवू शकत नाही. पुढील टप्प्यात नगरपर्यंत रेल्वेमार्ग मंजूर केला जाईल, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुरबाड येथे महायुतीच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे कल्याण-मुरबाड रेल्वे मंजूर झाली. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात अडीच वर्ष सर्व रेल्वे प्रकल्पांना राज्य सरकारने ५० टक्के निधी दिला नाही. त्यामुळे कल्याण-मुरबाड रेल्वेसह सर्व रेल्वे प्रकल्पांची कामे रखडली होती. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर तिसऱ्याच दिवशी मुरबाड रेल्वे प्रकल्पाला निधीची हमी देण्याचे पत्र घेऊन खासदार कपिल पाटील दिल्लीला गेले होते. या प्रकल्पासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातही तरतूद झाली असून, आता रेल्वे प्रकल्प पूर्ण होण्यास कोणीही थांबवू शकत नाही. मुरबाडहून नगरपर्यंत रेल्वेमार्ग मंजूर केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक विकासाची कामे झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारबरोबरच महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला. त्यामुळे भिवंडी लोकसभा मतदारसंघाबरोबरच मुरबाड विधानसभा मतदारसंघात विकासकामे झाली. यापुढील काळात मुरबाडच्या सर्वांगीण विकासासाठी मुरबाड विधानसभा मतदारसंघाचा समावेश एमएमआरडीएमध्ये करावा, अशी मागणी कपिल पाटील यांनी केली.