Navi Mumbai Metro Tendernama
मुंबई

Navi Mumbai : मेट्रोच्या वाढीव तिकीट दराबाबत वर्षभराची प्रतीक्षा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मेट्रो रेल्वेच्या तिकीट दर निश्चितीसाठी राज्यात नियामकांची रचना केली असून १ वर्षाने दर ठरवण्यासाठी नियामकासमोर प्रस्ताव पाठवला जातो. नियामकाने ठरवलेल्या दरानुसार त्यापुढे अंमलबजावणी केली जाते, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधीमंडळ अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत दिली. त्यामुळे नवी मुंबईतील मेट्रोच्या वाढीव तिकीट दरातील तफावतीबाबत आणखी वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मेट्रोला विद्युत शुल्क माफ करताना मेट्रोच्या प्रवाशांना किती फायदा होणार? तिकीट दर नेमका किती कमी होणार? असे सवाल विधान परिषदेतील कॉंगेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. तसेच मुंबई, नवी मुंबई मधील मेट्रोच्या तिकीट दरातील तफावतीबद्दल खुलासा करण्याची मागणीही त्यानी केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरातील तफावतीबद्दलची सूचना नियामकांकडे मांडण्यात येईल असे सांगितले.

विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत शुल्क सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान आमदार सतेज पाटील यांनी सहभाग घेतला. या शुल्क माफीचा उद्देश प्रवासी संख्येत वाढ व्हावी आणि त्यांच्यावरील तिकीट दराचा बोजा कमी व्हावा असा आहे. याचा फायदा मुंबई, पुणे, नवी मुंबई, नागपूर मेट्रोला होणार आहे. मात्र, या विद्युत शुल्क माफीमुळे मेट्रोच्या प्रवाशांना नेमका किती फायदा होणार? असा सवाल त्यांनी केला. मेट्रोसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आवश्यक असतानाही काही स्टेशनवर ही सुविधा अद्याप उपलब्ध नाही. तसेच मुंबई मेट्रोसाठी पहिल्या ३ किमीला १० रुपये तर ३ ते १२ किमीसाठी २० रुपये तिकीट दर असताना नवी मुंबई मेट्रोसाठी हाच दर अनुक्रमे २० रुपये व ४० रुपये आहे. मेट्रोच्या तिकीट दरातील या तफावतीबद्दल खुलासा व्हावा अशी मागणी त्यांनी केली.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,  मेट्रोचे प्राथमिक तिकीट दर हे त्यावर किती खर्च झाला हे लक्षात घेऊन ठरवले जातात. त्या प्रकल्पाचा रनिंग खर्च निघावा अशा पद्धतीने ही रचना केली जाते. तिकीट दर निश्चितीसाठी राज्यात नियामकांची रचना केली असून १ वर्षाने दर ठरवण्यासाठी त्यांच्यासमोर प्रस्ताव जातो. त्यांनी ठरवलेल्या दरानुसार त्यापुढे अंमलबजावणी केली जाते. दरातील तफावतीबाबतची आमदार पाटील यांची सूचना नियामकांकडे मांडण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. नवी मुंबई मेट्रोच्या प्रवाशांना तब्बल दुप्पटीचे तिकीटभाडे देऊन मेट्रोचा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मुंबई मेट्रोप्रमाणे नवी मुंबईकरांना किमान समान तिकीट भाडे आकारावे अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. यासाठी स्थानिकांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही साकडे घातले आहे. मुंबईत पहिल्या तीन किलोमीटरसाठी १० रुपये आणि तीन ते १२ किलोमीटर अंतराच्या मेट्रो प्रवासासाठी २० रुपये मोजावे लागतात. तर नवी मुंबईतील मेट्रोच्या पहिल्या दोन किलोमीटरसाठी १० रुपये आणि १ ते १० किलोमीटरचा प्रवास केल्यास ४० रुपये मोजावे लागतात. 'महामेट्रो'कडे मुंबई व नवी मुंबई मेट्रोचा कारभार चालविण्याचे काम आहे.