Thane Tendernama
मुंबई

'या' कारणांमुळे बदलणार ठाण्यातील स्मशानभूमींचा चेहरा-मोहरा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मृत व्यक्तीचा शेवटचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) कंबर कसली आहे. ठाणे शहरातील जुन्या स्मशानभूमींमध्ये (Crematorium) आता नव्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या कामासाठी ठाणे महापालिकेने तब्बल २० कोटींच्या निधीची तरतूद केली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत सद्यस्थितीला ३७ स्मशानभूमी कार्यान्वित आहेत. त्यातील फक्त ५ स्मशानभूमींच्या ठिकाणी अत्याधुनिक स्वरूपातील पायाभूत सुविधा उभारण्यात आलेल्या आहेत. उर्वरित ठिकाणी तशा कोणत्याही स्वरूपाच्या सुविधा नाहीत; तसेच अशा ठिकाणी लाकडांचा वापर केला जात असल्याने प्रदूषणातही वाढ होत आहे. त्यामुळे आता काही स्मशानभूमी अत्याधुनिक स्वरूपात उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना केली आहे. त्यानुसार महापालिकेने स्मशानभूमींच्या कामासाठी तब्बल २० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांची पाहणी करून पालकमंत्री शिंदे यांच्याकडून आढावा घेण्यात येत आहे. या दौऱ्यात अपूर्ण कामांची माहिती घेऊन कामे त्वरित पूर्ण करण्याबरोबरच शहरातील स्मशानभूमीचे सक्षमीकरणाच्या सूचना केल्या होत्या.

घोडबंदर भागात असलेल्या मानपाडा स्मशानभूमी आता येत्या काही महिन्यांत कात टाकणार असल्याचे दिसते आहे. यासाठी २ कोटींचा खर्च केला जाणार असून याठिकाणी इलेक्ट्रीक शवदाहिनी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

शहरातील इतर स्मशानभूमींच्या ठिकाणीदेखील संरक्षक भिंत बांधणे, पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, रंगरंगोटी करणे, दुरुस्तीची कामे करणे आणि त्यातही सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. त्यानुसार याचे टेंडरदेखील अंतिम झाले असून येत्या काही महिन्यात स्मशानभूमींमध्ये वाढीव मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.