Mumbai Tendernama
मुंबई

Dharavi Redevelopment : ‘धारावी बचाव’ आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर ‘डीआरपीपीएल’चा भूमिपूजन कार्यक्रम रद्द!

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : विकासाच्या नावावर अदानी आणि कंपनीला धारावीच्या नावाने मुंबई विकण्याचा घाट राज्य व केंद्र सरकारने घातला आहे. धारावीकरांसाठी प्रथम मास्टर प्लॅन आणि व घराच्या बदल्यात घर व दुकानाच्या बदल्यात दुकान तसेच सर्व धारावीकरांचे धारावीतच पुनर्वसन ही मागणी आहे. परंतु या मागणीचा विचार न करता धारावीमध्ये चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण सुरू आहे. त्याच्या विरोधात धारावी बचाव आंदोलनाच्यावतीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आयोजित केले होते.

दरम्यान, आंदोलनाचा इशारा देताच, डीआरपीपीएलने भूमी पूजनाचा कार्यक्रम रद्द केला आहे. गुरुवारी, १२/०९/२०२४ रोजी, सकाळी १०.३० वाजता, आरपीएफ ग्राउंड, रेल्वे कॉलनी, माटुंगा, मुंबई - १९ याठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम नियोजित होता. धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे धारावी बचाव आंदोलनाने वेळोवेळी विविध आंदोलनात्मक कृती आणि निवेदनाद्वारे अनेक न्याय्य मागण्या केल्या आहेत. या मागण्यांकडे पूर्णपणे डोळेझाक करून या योजनेच्या भूमिपूजनाचा घाट घातला जात होता, असा आरोप आहे. प्रकल्पाचा मास्टर प्लॅन जाहीर करण्यात आलेला नाही. पात्रतेची अट रद्द करून घराच्या बदल्यात घर आणि दुकानाच्या बदल्यात दुकान धारावीतच मिळेल याची हमी देणारा शासन निर्णय अजून झालेला नाही. धारावीतील बहुतांश लोकांना अपात्र ठरवून त्यांना धारावी बाहेर हुसकावून लावण्याचा व धारावीच्या ठिकाणी दुसरी बीकेसी वसवण्याचा हा डाव असल्याचा आरोप आहे.

सरकारच्या मदतीने अदानी दामटू पाहत असलेल्या या फसव्या योजनेचा भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करावा, या मागणीकरिता आज बुधवार दिनांक ११/०९/२०२४ रोजी, लेबर रेस्टॉरंट समोर, माटुंगा लेबर कॅम्प, मुंबई - १९. याठिकाणी लाक्षणिक उपोषण आयोजित करण्यात आले होते, या उपोषण आंदोलनाची दखल घेऊन डीआरपीपीएलने भूमी पूजनाचा कार्यक्रम रद्द केला असला तरी, यापुढेही जेव्हा कधी हा कार्यक्रम आयोजित केला जाईल, तेव्हा तो कार्यक्रम पूर्ण ताकदीने उधळून लावला जाईल, असा इशारा यावेळी बोलताना खासदार अनिल देसाई यांनी प्रशासनाला दिला आहे. आजच्या लाक्षणिक उपोषण कार्यक्रमात माजी आमदार बाबुराव माने, शेतकरी कामगार पक्षाचे भाई अॅड. राजेंद्र कोरडे, साम्या कोरडे, आम आदमी पक्षाचे ॲड. संदीप कटके, पॉल राफेल, उल्लेश गजाकोष, हलिमा अंसारी सीपीआयचे कॉ. नसिरुल हक, सीपीएमचे वसंत खंदारे, शैलेंद्र कांबळे काँग्रेसचे अब्बास हुसैन, दीपक खंदारे सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा साळवींसह सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.