dharavi Tendernama
मुंबई

Adani: धारावी पुनर्विकासाचा नारळ फुटला, पण कुणी नाही पाहिला! DRPPLने गुपचूप उरकला कार्यक्रम

टेंडरनामा ब्युरो

Dharavi Redevelopment Project मुंबई (Mumbai) : धारावी पुनर्विकास प्रकल्पावर सातत्याने टीकेची झोड उठत असतानाच राज्य सरकारने अदानी समूहावर (Adani Group) धारावी पुनर्विकासाचे काम सोपविले आहे. त्यातच धारावीकरांच्या विरोधाचा सामना करावा लागू नये म्हणून कुणालाही थांगपत्ता लागू न देता धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन अदानी समूहाच्या धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीने (डीआरपीपीएल - DRPPL) माटुंगा आरपीएफ मैदानात उरकले. कोणताही गाजावाजा न करता हा कार्यक्रम पार पडला.

पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रेल्वे स्थानकानजीकच्या सेक्टर ६ मधील क्वॉर्टर्समध्ये राहणाऱ्या ८५० कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार असून, त्यासाठी आता आहे त्या जागेवर नव्या तीन इमारती बांधल्या जाणार आहेत. नव्या तीन इमारतींचे काम तीन वर्षांत पूर्ण होईल, असा दावा धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रायव्हेट लिमिटेडने केला असून, याव्यतिरिक्त याच जागेवरील सुमारे ३ हजार झोपडीधारकांनाही नवे घर दिले जाणार आहे.

धारावी पुनर्विकासाच्या टेंडरनुसार, ही रेल्वे कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आणि कार्यालये सरकारकडे हस्तांतरित केली जाणार आहेत. तसेच १ जानेवारी २००० ते १ जानेवारी २०११ दरम्यानच्या कालावधीतील रहिवाशांना परवडणाऱ्या किमतीत मालकीची घरे दिली जातील. २०११ नंतरच्या घरधारकांना राज्य सरकारच्या परवडणाऱ्या भाड्याच्या घरांच्या धोरणानुसार घरे दिली जातील. ज्यात भाड्याने घर घेऊन नंतर विकत घेण्याचा पर्याय असेल.

या अपात्र रहिवाशांना मुंबईत इतरत्र तयार करण्यात येणाऱ्या आधुनिक शहरात स्थालांतरित केले जाईल. सुमारे ३ हजार झोपडीधारकांनादेखील हेच निकष लागू असणार आहेत.

भूमिपूजन ७ सप्टेंबर २०२४ रोजी करण्याचा घाट घालण्यात आला होता. धारावी बचाव आंदोलनाने आंदोलनाचा इशारा देताच हा कार्यक्रम रद्द करून तो १२ सप्टेंबर रोजी करण्याचे ठरले. १२ सप्टेंबरचा भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळण्याचा इशारा आम्ही दिला होता. ११ सप्टेंबरचे उपोषण झाले.

उपोषणावेळी प्रशासनाने पोलिसांना निरोप पाठविला की १२ सप्टेंबरचे भूमिपूजन रद्द केले आहे. त्यामुळे उपोषणाचा कार्यक्रम आटोपता घेत डीआरपीपीएलने दिलेली माहिती आणि पोलिसांची विनंती यांना मान देत १२ तारखेचे आंदोलन स्थगित केले.

आता भूमिपूजनाचा कार्यक्रम गुपचूप उरकला आहे. डीआरपीपीएल कंपनीचा पुनर्विकास प्रकल्पाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाल्याचे आम्ही मानत नाही. ही केवळ यंत्रसामुग्रीची पूजा आहे. जर हे भूमिपूजन असेल तर या सोहळ्याची निमंत्रण पत्रिका का नाही? सोहळ्याला पंतप्रधान, मुख्यमंत्री, लोकप्रतिनिधी का नाहीत? लपूनछपून भूमिपूजन का? असे प्रश्न धारावी बचाव आंदोलनाने उपस्थित केले आहेत.

इतक्या लबाडीने भूमिपूजन उरकणारा विकासक धारावीकरांशी प्रामाणिक राहून त्यांना धारावीत घर देईल यावर विश्वास कसा ठेवायचा? चोराच्या मनात चांदणे, तसे अदानीच्या मनात बीकेसी असल्यामुळे धारावीकरांना धारावीबाहेर मिठागराच्या आणि कचरापट्टीच्या जमिनींवर हुसकावून लावले जाईल ही भीती खरी ठरेल, असे धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक ॲड. राजेंद्र कोरडे यांनी म्हटले आहे.