Mumbai

 

Tendernama

मुंबई

मुंबई उपनगरातील 'या' चौकांचे रुपडे पालटणार;19 कोटी 51 लाखांचा खर्च

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई उपनगरातील सहा महत्वाच्या जंक्शनचे रुप पालटणार आहे. चौकांचे लॅन्डस्केपिंग करण्यात येणार असून आवश्‍यक तेथे रुंदीकरणासह सुशोभीकरणही करण्यात येणार आहे. वाहनांबरोबर पादचारर्यांचाही विचार करुन आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी 19 कोटी 51 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला.

जिल्हा नियोजन समिती मार्फत उपनगरातील चौकांचे रुप पालटण्यासाठी 35 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पश्‍चिम उपनगरातील चार आणि पूर्व उपनगरातील दोन चौकांची यासाठी निवड करण्यात आली आहे.

या प्रकल्पात फक्त चौकांची रंगरंगोटी, फलक लावण्याच्या कामाच्या पुढे जाऊन चौकांचे लॅन्डस्केपिंग करण्यात येणार आहे. त्याच आवश्‍यक असलेल्या ठिकाणी रुंदीकरण करण्यात येणार आहे. या सहा चौकांच्या परिसरात वाहनांसह पादचाऱ्यांनाही अडथळा होणार नाही अशा पध्दतीने नियोजन करण्यात येणार आहे. त्यात आवश्‍यक पथदिवे लावणे, माहिती फलक, आसन व्यवस्था करणे, वाहनांसाठी पार्किंगची सोय उपलब्ध करुन देणे अशी विविध कामे करण्यात येणार आहे. तसेच, आवश्‍यकते नुसार वृक्षारोपण, हिरवळ तयार करण्याचीही कामे केली जाणार आहेत. बस थांब्यांचे नियोजन करताना रिक्षा, टॅक्सी स्टॅंड शिस्तबध्द पध्दतीने करण्यात येतील. पादचाऱ्यांसाठी प्याऊ तयार करण्यात येईल, असे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

हे ते सहा चौक
- अंधेरी घाटकोपर जोड रस्त्यावरील साकीनाका जंक्शन पासून पश्‍चिम द्रुतगर्ती मार्ग मेट्रो स्थानकापर्यंत
- जुहू विलपार्ले जंक्शन
- जोगेश्‍वरी विक्रोळी आणि साकी विहार रोड जंक्शन
- कांदिवली साई स्टार जंक्शन
- महात्मा गांधी रोड आणि साकी विहार जंक्शन मथुरासाद मार्गापर्यंत साकी विहार रोड जंक्शन कांदिवली
- मुलूंड आर्य समाज चौक

24 टक्के बिलो टेंडर-
मुंबई महापालिकेने या प्रकल्पासाठी 25 कोटी 71 लाख रुपयांचे अंदाजपत्र तयार केले होते. पात्र कंत्राटदाराने 24.10 टक्के कमी दराने 19 कोटी 51 लाख रुपयांत हे काम करण्याची तयारी दाखवली आहे, तशी माहिती प्रशासनाने स्थायी समितीच्या पटलावर मांडली आहे.