bus Tendernama
मुंबई

Thane : 42 ई-बस टेंडरकडे ठेकेदारांची पाठ, काय आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे महापालिकेने (Thane Municipal Corporation) ४२ इलेक्ट्रिक बसगाड्या खरेदीचा निर्णय घेतला आहे. यात ९ मीटरच्या २५ तर, १२ मीटरच्या १७ बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. या कामासाठी महापालिकेने टेंडर काढले आहे. मात्र, या टेंडरला फक्त दोनच ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे या टेंडरला मुदतवाढ देण्यात आली आहे.

ठाणे शहरातील झपाट्याने होणारा विस्तार त्याचबरोबर नागरीकरण यामुळे शहराच्या लोकसंख्येतदेखील वाढ होत आहे. ठाणेकरांचा प्रवास सुखकर आणि पर्यावरणस्नेही व्हावा, यासाठी महापालिका प्रशासनाने प्रदूषणविरहित अशा इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत इलेक्ट्रिक बसेस टप्याटप्याने खरेदी करण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी या उपक्रमांतर्गत १२३ पर्यावरणपुरक इलेक्ट्रिक बसगाड्या खरेदी करण्यात आल्या आहेत. जून महिनाअखरेपर्यंत या सर्व बसगाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल होणे अपेक्षित असताना केवळ १३ बसगाड्या आतापर्यंत उपलब्ध झाल्या आहेत. बसगाड्या देण्यास उशीर केल्याप्रकरणी परिवहन प्रशासनाने ठेकेदारावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली होती.

यंदाच्या वर्षीही परिवहन प्रशासनाला १५ कोटी ५० लाखांचा निधी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत उपलब्ध झाला आहे. यातून आणखी ४२ बस घेण्यात येणार आहेत. यासाठी परिवहन सेवेकडून बसखरेदीबाबत टेंडर प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, या टेंडर प्रक्रियेकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून आले. त्यामुळे परिवहन प्रशासनाने या टेंडर प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. यामुळे ठाणेकरांना ४२ इलेक्ट्रिक बसची आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.