Dahisar Skywalk Tendernama
मुंबई

Mumbai : दहिसरच्या 'त्या' स्कायवॉकची पुनर्बांधणी कधी? ठेकेदाराकडून 30 कोटीत जुजबी मलमपट्टी सुरु

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : दहिसर पश्चिम येथील लोकमान्य टिळक मार्गावरील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, एमएमआरडीएकडून महापालिकेला हस्तांतरीत झालेल्या स्कायवॉकचे बांधकाम धोकादायक झाल्यामुळे याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. येथील ७ जिन्यांसह स्कायवॉकचा डेक स्लॅब जीर्ण अवस्थेत असल्याने ते पाडून त्यांची पुनर्बांधणी करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे, या कामावर ३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्यानंतरही केवळ डागडुजीचीच कामे केली जात असून जिन्यांचे पुनर्बांधकाम होत नाही. महापालिकेच्या पूल विभागाच्या अभियंत्यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.

दहिसर (पश्चिम) येथील एल.टी. मार्गावरील सध्या अस्तित्वात असलेले स्कायवॉक हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत सन २०१० साली बांधण्यात आले होते. हे स्कायवॉक २०१५ मध्ये एमएमआरडीएकडून “जसे आहे तसे ” या तत्वावर मुंबई महापालिकेला सोपविण्यात आले होते. पण हे स्कायवॉक ताब्यात घेतल्यानंतर २०१६ मध्ये या स्कायवॉकचा काही भाग कोसळला. त्यामुळे हे स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर मुंबई व्हीजेटीआयचे प्रा. डॉ. अभय बांबोळे यांनी स्कायवॉकची संरचनात्मक तपासणी अहवाल सादर केला होता. त्यात स्कायवॉकचा जीर्ण स्लॅब तोडून मुख्य संरचनात्मक दुरुस्ती करण्याचे सूचविले होते. परंतु या स्कायवॉकची दुरुस्ती वेळीच न झाल्याने पुन्हा या स्कायवॉकची एस सी जी कन्सल्टन्सी सर्विसेस या सल्लागाराने तपासणी करुन ७ नोव्हेंबर २०२२ रोजी लेखापरीक्षण अहवाल सादर केला, अहवालानुसार स्कायवॉकच्या ८ पैकी ७ जिन्यांसह स्कायवॉकचा डेक स्लॅब धोकादायक अवस्थेत असल्याने ते बांधकाम पाडून त्याची पुनर्बांधणी करण्याची शिफारस केली.

त्यानसार महापालिकेच्या पूल विभागाने या स्कायवॉकचे बांधकाम तोडून त्याची पुनर्बांधणी करण्यासाठी ३० कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली. या कामांसाठी महापालिकेने 'स्वस्तिक कन्स्ट्रक्शन' या कंपनीची निवड केली होती. या कामाला ऑक्टोबर २०२३मध्ये मंजुरी मिळाल्यांनतर सहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र, आतापर्यंत स्कायवॉकचा डेक स्लॅब तोडून त्यावर फायबरचा स्लॅबचा वापरुन रंगरंगोटी केली जात आहे. हा स्लॅब आतापर्यंत भगवान शांतीनाथ चौक ते दीपा बारपर्यंतच पूर्ण झाला आहे आणि या पट्टयांत गुलाबी रंग लावून त्यावर रंगरंगोटी केली जात आहे. मात्र या पट्टयातच दोन जिने येत असून त्यावर स्टील पाईप लावले जात आहेत. प्रत्यक्षात हे जिने तोडून नव्याने बांधणे आवश्यक असताना त्यावर स्टीलचे पाईप लावले जात असल्याने नक्की जिने तोडून त्यांचे पुनर्बांधकाम केले जाणार आहे की केवळ मलमपट्टी करून पुनर्बांधणीचा निधी हडप केला जाणार आहे, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.