BMC Tender Scam Tendernama
मुंबई

Mumbai : महापालिकेच्या 'या' खात्यात 330 कोटींचा टेंडर घोटाळा; मर्जीतील ठेकेदाराला रेड कार्पेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्यात शैक्षणिक साहित्य खरेदीत ३३० कोटींचा टेंडर घोटाळा झाला आहे. या घोटाळ्याची महानगरपालिका आयुक्तांनी सखोल चौकशी करावी. तसेच, दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसने पत्रकार परिषदेत केली.

महापालिकेच्या शाळेत सुमारे ४ लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी २७ शालेपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र, टेंडर प्रक्रिया राबवताना सर्व नियमांना बगल देण्यात आली, असा आरोप मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते युवराज मोहिते यांनी केला. महापालिकेने १५ जूनपासून २५ लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या टेंडरसाठी एसआरएम पद्धत बंद करण्याबाबत १० मे २०२३ रोजी एक परिपत्रक जारी केले. मात्र, १४ जून रोजी एक दिवस आधीच शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसंदर्भातील टेंडर एसआरएमवर अपलोड करण्यात आले. हे टेंडर एका महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, डिसेंबरपर्यंत त्यावर काहीच कार्यवाही करण्यात आली नाही.

डिसेंबर २०२३ मध्ये आणखी एक परिपत्रक काढून सहा महिन्यानंतर संबंधित टेंडर महाटेंडरमध्ये जाऊ शकत नसल्याने या टेंडरला एसआरएममधून परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या सर्व प्रकरणाबाबत विचारणा केली असता महापालिका अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असे माजी नगरसेवक अश्रफ आझमी यांनी सांगितले. शिक्षण साहित्याचे टेंडर जर महाटेंडरमध्ये गेले, तर अनेक इच्छुकांनी टेंडर भरले असते. परिणामी, मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राट मिळाले नसते. यामुळे विद्यार्थ्यांना अद्याप शैक्षणिक साहित्याचे वाटप झालेले नाही, असा आरोप त्यांनी केला. शाळा सुरू होऊन महिना उलटला तरी महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सुमारे ५० टक्के शालेय साहित्याचे वाटप झालेले नाही. महापालिकेने मर्जीतील कंत्राटदाराला कंत्राट मिळावे यासाठी नियमांची पायमल्ली केली आहे, असा आरोपही यावेळी करण्यात आला.