मुंबई (Mumbai) : राज्यात अंत्योदय रेशनकार्डवर मोफत वाटप केल्या जात असलेल्या साड्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या आहेत. महिलांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन साड्या परत करण्याचा प्रयत्न केला. तर दुकानदार म्हणतो, ‘फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते.’ तर मग फक्त जाहिरातबाजीसाठी राज्यातील गरीब महिला भगिनींची चेष्ठा करता का अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी राज्य सरकारवर केली आहे.
या योजनेवर वर्षाला सुमारे १२५ कोटी रुपये खर्च केले जात आहेत. वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण जाहीर केले आहे. या धोरणानुसार राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दर वर्षी एक साडी मोफत देण्यासाठी 'कॅप्टिव्ह मार्केट योजना' राबविण्यात येत आहे. ही योजना २०२३ ते २०२८ या पाच वर्षांसाठी निश्चित करण्यात आली असून राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना वस्त्रोद्योग विभागामार्फत यंत्रमागावर विणलेली प्रति कुटुंब एक साडीचे रेशन दुकानावर मोफत वाटप करण्यात येणार आहे. २०२३-२०२४ या वर्षासाठी राज्य सरकारने महामंडळास प्रत्येक साडीमागे ३५५ रुपये दिले आहेत. त्याचा लाभ जवळपास २४ लाख ८० हजार ३८० कुटुबांना होणार आहे. म्हणजेच वर्षाला सुमारे ९० कोटी रुपयांच्या साड्यांची खरेदी केली जाणार आहे. जाहिरात, वाहतूक खर्च, गोदामात साठवणूक, हमाली हा सर्व खर्चही राज्य सरकार महामंडळाला देणार आहे.
१ फेब्रुवारी २०२४ पासून साडी वाटप सुरू करण्यात आले आहे. या साड्यांच्या निमित्ताने महिलांना या सरकारने रांगेत लावले. इतका सगळा त्रास सहन करून हाती आलेल्या साड्या पाहिल्या तर काय त्या फाटक्या आणि कुचक्या निघाल्या आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या झरी, कळंब, मारेगावसह अनेक तालुक्यांत या घटना समोर आल्या आहेत. या महिलांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन साड्या परत करण्याचा प्रयत्न केला. तर दुकानदार म्हणतो, ‘फुकटच्या साड्यांची गॅरंटी नसते.’ त्यावर वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली आहे. ते पुढे म्हणाले की, कुठल्याच गोष्टींची गॅरंटी नाही हीच मोदींची गॅरंटी आहे. म्हणून तर दोन दिवसांपूर्वी नागपुरातील रेशीमबागेत महिला कामगारांना किचन किट वाटपाच्या नावाखाली रांगेत लावले. सर्व्हर डाऊन झाल्याचे सांगून वाटप बंद केले. सरकारचा फोलपणा लक्षात आल्याने कामगार महिला चिडल्या. संतापल्या..! चेंगराचेंगरी झाली आणि एका महिलेचा जीव गेला. दुसऱ्या दिवशी वाटप बंद केले. कुठे रेशनवर मायमाऊलींना फाटक्या साड्या दिल्या जातात, कुठे किचन किटच्या नावावर जीव जातात. जाहिरातबाजीसाठी महिला भगिनींची चेष्ठा का करता असा सवालही वडेट्टीवार यांनी केला आहे.