Vijay Wadettiwar Tendernama
मुंबई

ठेकेदार संघटनांच्या पत्राने खळबळ; सरकारमध्ये ठेकेदारांना ओरबाडण्याची स्पर्धा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महाविकास आघाडीकडून ओरबाडून सत्ता घेणारे आता राज्यातील कंत्राटदारांकडून ओरबाडून वसूली करत आहेत, अशी जहाल टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केली आहे. विकासकामांच्या माध्यमातून आपला विकास करण्याची, खंडणी मागण्याची नवीन प्रथा महायुतीने राज्यात आणली असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.

राज्य अभियंता संघटनेने राज्य सरकारकडे ठेकेदारांच्या संरक्षणाची मागणी केली आहे, त्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार पुढे म्हणाले की, कंत्राटी सरकारमध्ये कंत्राटदार सुरक्षित नाहीत, हे महाराष्ट्राचे सत्य आहे. महायुतीतील गुंड आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या वसुली मोहिमेने आणि भाईगिरीने त्रस्त कंत्राटदारांना राज्य सरकारकडे संरक्षण मागण्याची वेळ राज्यात पहिल्यांदाच आली आहे. यावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती काय आहे हे स्पष्ट आहे. खोके सरकारच्या काळात आता कंत्राटदारांवर खोके देण्याची वेळ आली आहे. निवडणुकीपूर्वी किती वसुली करावी आणि किती नाही अशी स्पर्धा महायुतीतील तीनही पक्षात सुरू असल्याची साक्ष देणारे राज्य अभियंता संघटनेचे हे पत्र आहे असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

राज्य अभियंता संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले व सरचिटणीस प्रशांत कारंडे यांनी हे पत्र राज्य सरकारला लिहिले आहे. सत्ताधारी आमदार, खासदार व इतर लोकप्रतिनिधींनी राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर करुन आणली आहेत. ही विकास कामे सुरु असताना संबंधित कामांवर सत्ताधाऱ्यांच्यी विरोधातील राजकीय मंडळी ही कामे सर्रास बंद करीत आहेत. तसेच ही कामे करणाऱ्या कंत्राटदार व विकासकाला व त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या मजुरांना गावा-गावात दमदाटी, अवार्च्य भाषा वापरणे व मारहाण करीत आहेत. तसेच कंत्राटदारांकडे आर्थिक मागणी सुद्धा केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कंत्राटदार संरक्षण कायदा करावा अन्यथा राज्यातील सर्व विकासकामे बंद करण्याचा निर्णय राज्यातील सर्व कंत्राटदार व अभियंता संघटनेने घेतला असल्याचा इशारा पत्राद्वारे देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हे पत्र लिहिले आहे.

राज्यात अशा अनेक घटना घडत आहेत. कंत्राटदारांचे हात अडकले असल्याने ते हताश होऊन तोंड दाबून बुक्याचा मार सहन करीत आहेत. कोणीही येतो काम बंद करतो, कंत्राटदारांना शिव्या देतो, मारहाण करतो ही मोगलाई शासनाचे मंत्री व प्रशासनाने बंद करावी अन्यथा राज्यातील सर्व विकासकामे ऐन फेब्रुवारी मार्चच्या काळात बंद केली जातील याची नोंद शासनाने घ्यावी, असा इशाराही राज्यातील सर्व कंत्राटदार व अभियंता संघटनेने दिला आहे. तसेच कंत्राटदारांची जिवितहानी व इतर बाबींचे संरक्षण होण्यासाठी शासनाने कायदा पास केल्याशिवाय राज्यातील कामे सुरू करणार नाहीत, असा निर्णय राज्यातील संघटनांनी एकत्र येऊन घेतला आहे, असेही पत्राद्वारे कळवले आहे.