Mumbai Tendernama
मुंबई

Dharavi Redevelopment : लोकप्रतिनिधी आहात की अदानींचे एजंट? आशिष शेलार यांना बोचरा सवाल

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुरुवातीपासूनच आक्रमक आहे. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने या प्रकल्पाच्या निमित्ताने अदानींना लक्ष्य करत आहेत. यावर नुकतेच मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी, शहरी नक्षलवाद्यांच्या मार्गदर्शनानुसार ठाकरे गटाची लढाई अदानी यांच्याविरोधात सुरु असल्याचा आरोप केला आहे. त्यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी, लोकप्रतिनिधी आहात की अदानींचे एजंट? असा बोचरा सवाल आशिष शेलार (Ashish Shelar) यांना केला आहे.

आमदार आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच महायुती राजकीयदृष्ट्या जिंकू शकत नसल्याने धारावीच्या माध्यमातून मुंबई कोणाला तरी फुकट देण्याचे काम सुरू आहे. महायुतीने मुंबई अदानी यांच्या घशात घालण्याचे ठरवले आहे, अशी टीका केली. या प्रकल्पात दीड लाख धारावीवासीय मुंबई बाहेर फेकले जाण्याची भीतीही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच, सत्तेत आल्यावर धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे टेंडर रद्द करण्याची घोषणा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली.

या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे पिता-पुत्रावर पलटवार केला आहे. फेक नॅरेटिव्ह रोखणे माझे काम असल्याचे सांगत ते म्हणाले, काँग्रेसने पूर्वीच्या 2 हजार झोपड्यांना संरक्षण दिले होते, मात्र भाजपा सरकारने 2011पर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण दिले आहे. त्यामुळे धारावीतील 2011पर्यंतच्या रहिवाशांना धारावीतच घरे मिळतील. मात्र त्यानंतरची जी दुमजली घरे आहेत, पण अशा पुर्नविकासात पात्र ठरत नाहीत, अशा घरांनाही मुंबईतच घर मिळणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. याला प्रत्यूत्तर देताना सचिन सावंत यांनी आपण जनतेचे प्रतिनिधी आहात की अदानींचे एजंट आहात? असा खरमरीत सवाल केला आहे. धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच होणार असेल तर मग धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी डंपिंग ग्राउंड, मिठागरांसहित इतर ठिकाणी का जागा देत आहात? धारावीचा विकास नव्हे हा अदानींचा विकास आहे, अशी टीकाही सावंत यांनी केली आहे.