BMC, Ravi Raja Tendernama
मुंबई

Mumbai : प्रकल्प कागदावरच अन् खर्चात मात्र 2 हजार कोटींची वाढ; टेंडरवर प्रश्न

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : दहिसर-भाईंदर उन्नत रस्त्याचे काम सुरू होण्याआधीच १,९९८ कोटींवरून चार हजार कोटींवर पोहोचलेच कसे, असा सवाल मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. प्रकल्प सुरू होण्याआधी खर्चात वाढ म्हणजे टेंडर प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे दहिसर भाईंदर उन्नत रस्ते प्रकल्पाच्या खर्चाची माहिती द्या, अशी मागणी रवी राजा (Ravi Raja) यांनी केली आहे.

दहिसर-भाईंदर उन्नत रस्त्याचे काम करण्यासाठी जून २०२२ मध्ये टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली, त्यावेळी १,६०० कोटी रुपये खर्च अंदाजित केला होता. परंतु टेंडरला प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा एकदा ऑक्टोबर २०२२ मध्ये टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. त्यावेळी प्रकल्पाचा अंदाजित खर्च २,५२७ कोटींवर पोहोचला. मात्र दुसऱ्या टेंडर प्रक्रियेत ही ठेकेदारांचा प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली असून प्रकल्प खर्च चार हजार कोटींवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे फक्त टेंडर प्रक्रिया राबवत असताना कोणतेही काम सुरू नसताना खर्चात वाढ झाली कशी, असा प्रश्न रवी राजा यांनी उपस्थित केला आहे. प्रकल्प सुरू होण्याआधी खर्चात वाढ म्हणजे टेंडर प्रक्रिया संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे.

दहिसर (पश्चिम) ते भाईंदर (पश्चिम) दरम्यान जोडणाऱ्या उन्नत मार्ग प्रकल्पाचा खर्च एमएमआरडीए करणार होती. परंतु आता या प्रकल्पाचा खर्च मुंबई महानगरपालिका करणार असली तरी काम सुरू झाले नसताना खर्चात वाढ कशी, असा सवाल उपस्थित करत संपूर्ण प्रकल्प खर्चाचा हिशेब द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.