Nana Patole Tendernama
मुंबई

'IT SEZ'चा 'तो' निर्णय काही बिल्डरांच्या हिताचा;नाना पटोलेंचा आरोप

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई आणि परिसरातल्या क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेत प्रिमियममध्ये ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. धारावीचा पुर्नविकास करणाऱ्या अदानी आणि बिल्डर मंत्री लोढा यांच्या सारख्या मोठ्या उद्योगपतींच्या फायद्यासाठीच ही योजना आणली आहे. समूह विकासाला सवलत ही सामूहिक कमिशनखोरी आहे. याविरोधात काँग्रेस पक्ष न्यायालयात दाद मागणार आहे, असे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी म्हटले आहे.

यावेळी पटोले यांनी शिंदे फडणवीस सरकारचचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, क्लस्टर डेव्हलपमेंट ही योजना फक्त सामूहिक विकासासाठीच का? एक-दोन इमारतींच्या पुर्नविकासासाठी ही सवलत का नाही?  तसेच आयटी पार्कच्या जमीन वापराबाबत शिंदे फडणवीस सरकारने एक निर्णय घेतला असून आता आयटी सेझ मधील ६० टक्के क्षेत्राचा आयटीसाठी व ४० टक्के जागेचा गैर आयटी क्षेत्रासाठी (पूरक सेवांसाठी) वापर करण्यात येणार आहे. यापूर्वी फक्त २० टक्के जागेचा वापर गैर आयटी (पूरक) सेवांसाठी करण्याला परवानगी होती. ती वाढवून आता ४० टक्के केली आहे. याचा फायदा मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर व अंबरनाथ या परिसरातील मोजक्या ४ ते ५ बिल्डरांना आणि उद्योगपतींना होणार आहे, या निर्णयाविरोधातही काँग्रेस पक्ष कोर्टात जाणार आहे.

शिंदे फडणवीस सरकार म्हणजे घोषणांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ अशी परिस्थिती आहे. घोषणा, इव्हेंट, जाहिरातबाजी यापलीकडे या सरकारचे दुसरे कोणतेही काम नाही. राजकीय सभा असो किंवा मंत्रीमंडळाची बैठक सगळीकडे फक्त घोषणाबाजी सुरु आहे. मंगळवारी ३० मे रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत सरकारची हीच कार्यपद्धती दिसून आली. अनेक लोकोपयोगी घोषणा केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला  आहे. ‘नमो’ शेतकरी महासन्मान योजना ही त्यापैकी एक आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेच्या अनुदानात थोडी भर घालून आम्हीच शेतक-यांना दरवर्षी १२ हजार रूपये देत आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न शिंदे सरकार करत आहे. ही नवी योजना म्हणजे नमो फसवणूक योजना आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन दिले होते त्याचे काय झाले? असा सवालही पटोले यांनी केला आहे.

या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे व प्रदेश प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, भरत सिंह उपस्थित होते.