मुंबई (Mumbai) : धारावी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने मोठा भ्रष्टाचार केला आहे. पुनर्वसन प्रकल्पासाठीच्या ४५ एकर जमिनीसाठी फडणवीस सरकारने रेल्वेला ८०० कोटी दिले परंतु आजपर्यंत ती जमीन राज्य सरकाला मिळालेली नाही आणि ८०० कोटी रुपयेही परत मिळाले नाहीत. ही जनतेच्या पैशाची लूट असून या घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले पुढे म्हणाले की, धारावीतील लोकांना चांगली घरे मिळावीत, धारावीचा कायापालट व्हावा, मुंबई स्वच्छ व सुंदर व्हावी यासाठी विलासराव देशमुख यांचे सरकार असताना धारावीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुनर्वसन प्रकल्पाची योजना मांडली होती परंतु काहीकारणाने ती कार्यान्वित होऊ शकली नाही. ही योजना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने सुरु केली.
याकामी फडणवीस सरकारने ८०० कोटी रुपये रेल्वेला जमिनीसाठी दिले पण आजपर्यंत त्या योजनेचे काम पुढे गेले नाही. जमीनही मिळाली नाही आणि पैसेही परत आलेले नाहीत. ह्या पैशाचे काय झाले? योजना का फसली? जनतेचे पैसे रेल्वेला दान करण्याचा अधिकार फडणवीस यांना कोणी दिला ? याची चौकशी एसआयटीचे गठन करून त्यामार्फत करावी, हवे तर ईडी व सीबीआय चौकशीसाठी शिफारस करावी अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे.