मुंबई (Mumbai) : राज्य सरकारने ठाणे शहरात रस्त्यांच्या कामांसाठी तब्बल ६०५ कोटींचा निधी दिला आहे. मात्र रस्त्यांची ही कामे विशिष्ट ठेकेदारांना मिळावी यासाठी टेंडर भरताना १० ते १६ टक्क्यांपर्यंत कमी दराने टेंडर भरण्यात आली तसेच ही कामे मिळावीत यासाठी १६ टक्क्यांचे वाटपही झाले आहे. रस्त्यांच्या कामांच्या दर्जाबाबतही शंका असून सर्व कामांची पोलखोल केली जाणार असल्याचे कॉंग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण (Vikrant Chavan) यांनी म्हटले आहे. त्यामुळे रस्त्यांच्या कामांची तसेच यात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीसाठी तब्बल ६०५ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्पयासाठी २१४ कोटी तर दुसऱ्या टप्यासाठी ३९१ कोटींची तरतूद करण्यात आली आहेत. दोन्ही टप्प्यांची कामे एकाच वेळी सुरु करण्यात आली आहेत. रस्त्यांच्या कामांची ३१ मे ही शेवटची मुदत होती मात्र ही मुदत देखील संपली असून अजूनही रस्त्यांची कामे अर्धवटच आहेत. असे असताना आता रस्त्यांच्या कामातही अनियमितता झाली असल्याचा आरोप त्यांनी केला. रस्त्यांची कामे विशिष्ट ठेकेदारांना मिळावी यासाठी टेंडर भरताना १६ ते १० टक्क्यांपर्यंत कमी दराने टेंडर भरण्यात आली असून ही कामे मिळावी यासाठी १६ टक्क्यांचे वाटपही झाले असल्याचा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे रस्त्यांच्या कामांच्या दजार्बाबतही प्रश्चचिन्ह उपस्थित करत या सर्व कामांचे छायाचित्र काढण्यात आले असून कामांची पोलखोल देखील केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे महापालिकेचा अर्थसंकल्प हा ५०० कोटींवरून आजच्या तारखेला साडेचार हजार कोटींवर गेला आहे. विकासकामांवर २५ वर्षात २५ हजार कोटी खर्च होऊनही ठाण्याचा विकास का झाला नाही? ठाण्याचा विकास झाला नसल्यानेच ठाण्याच्या विकासासाठी शासनाकडून निधी आणावा लागत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. ठाण्याच्या विकासकामांची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: करतात. मुख्यमंत्र्यांसोबत आमदार फिरले तर आम्ही समजू शकतो मात्र त्यांच्यासोबत इतरही काहीजण फिरत असून या कामांचे श्रेय घेणारे हे कोण असा प्रश्न उपस्थित करत चव्हाण यांनी थेट शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते नरेश म्हस्के यांचे नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली आहे.