मुंबई (Mumbai : वरळी ते नरीमन पॉईंटपर्यंतच्या सागरी किनारी मार्गाचे बोगदा खोदण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर "मावळा'आता दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी सज्ज झाला आहे. पुढल्या महिन्यापासून दुसऱ्या टप्प्यातील खोदकामाला सुरुवात करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे. हा बोगदा जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण होणार आहे.
प्रिय दर्शनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंतचा 2.07 किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्याचे काम 11 जानेवारी रोजी पूर्ण झाले. भारतातील सर्वात मोठ्या टनेल बोरींग मशिनने हे काम करण्यात आले असून त्याचे नामकरण "मावळा'असे करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील खोदकाम पूर्ण झाल्यानंतर ही महाकाय मशीन आता गिरगाव चौपाटी येथे प्रियदर्शनी पार्कच्या दिशेने फिरविण्यात आली आहे. प्राथमिक आढावा घेऊन आवश्यक तयारी करुन एप्रिलमध्ये पुन्हा कामाला सुरवात केली जाणार आहे. गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क असा 2.07 किलोमीटरचा बोगदा तयार करण्यात येणार आहे.
2300 टन वजनाची आणि 12.19 मीटर व्यासाची ही मशीन आहे. भारतात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या व्यासाच्या मशीनने खोदकाम केले जात आहे. हे मशीन चीनवरुन आणण्यात आले आहे. सुट्ट्या भागात आणलेल्या या मशीनचे भाग जुळवण्यासाठी चीनचे तज्ज्ञ येणार होते. मात्र, याच काळात भारत आणि चीनमधील संबंध ताणल्याने भारतीय तज्ज्ञांनी ही मशीन जुळवण्याचे आव्हान स्वीकारले.