Sevagram Tendernama
मुंबई

'सेवाग्राम'साठी ८१ कोटी; २४४ कोटींच्या सुधारित आराखड्यासही मान्यता

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांसाठी ८१.५७ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, एकूण २४४.०८७ कोटी रुपयांच्या सुधारित सेवाग्राम आराखड्यासही मान्यता देण्यात आली. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करावयाची कामे ही वेळेत पूर्ण व्हावीत, त्या कामांचा दर्जा उत्कृष्ट राहील याची दक्षता घ्या, अशा सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.

आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सेवाग्राम विकास आराखड्यासंदर्भातील शिखर समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

जिल्हा वार्षिक योजनेच्या सूत्रानुसार देय ठरणाऱ्या निधी व्यतिरिक्त आणखी १० कोटी रुपये इतका अतिरिक्त निधी दरवर्षी जिल्हा नियोजन समिती, वर्धा यांना सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करण्यात आलेल्या कामाच्या संवर्धनासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

बैठकीत 'राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती' हा नवीन उपक्रम राबविण्यास देखील मान्यता देण्यात आली. आज मंजूर करण्यात आलेल्या ८१ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीमध्ये या नवीन उपक्रमासाठी ३९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामध्ये विविध नाविन्यपूर्ण कामांचा समावेश करण्यात आला आहे. या उपक्रमांमध्ये ग्रंथालय आणि रिसोर्स सेंटर, गांधी विचार आणि प्रतिमा : हेरिटेज ट्रेलचा विस्तार, अभ्यागत केंद्राच्या ठिकाणी इंटरॲक्टीव्ह प्रदर्शन - ३ डी इमेजिंग, मल्टी मिडिया तंत्रज्ञानाचा वापर करून गांधीजींचे अर्थव्यवस्था, धर्म, जाती, लिंग यासंबंधीचे विचार तरूण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वर्धा रेल्वे स्थानक परिसरातील जुन्या रेल्वे कोचच्या आसपास दक्षिण अफ्रिकेतील निवासाबाबत कलाकृती, प्रदर्शन आणि नवीन लँडस्केपची निर्मिती केली जाणार आहे. सेवाग्राम आश्रम परिसरातील हेरीटेज पोस्ट ऑफीसचा वारसा जतन करून तिथे तिकीट संग्रहालय प्रदर्शनीचे आयोजित करण्यात येईल. याशिवाय या परिसरातील तलाव, बागांच्या विकासाची कामेही हाती घेण्यात येणार आहेत.

बैठकीत सेवाग्राम विकास आराखडा-वर्धा या कॉफी टेबल बूकचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. जिल्हाधिकारी वर्धा यांनी सेवाग्राम विकास आराखड्यातील कामांच्या प्रगतीची माहिती देणारे सादरीकरण केले.

बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, पशुसंवर्धन मंत्री तथा वर्ध्याचे पालकमंत्री सुनील केदार, मुख्यसचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते.