Airport Tendernama
मुंबई

पालघरमध्ये उभारणार ३०० एकर जागेत ‘सॅटेलाईट’ एअरपोर्ट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईच्या विमानतळावरील वाढता प्रवासी भार कमी करण्यासाठी पालघर (Palghar) जिल्ह्यात नवीन ‘सॅटेलाईट’ विमानतळ उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विमान प्राधिकरणाच्या बैठकीत घेतला. तब्बल ३०० एकर जमिनीवर हा विमानतळ उभारण्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या सरकारी जागांचा अहवाल तातडीने सादर करत प्रकल्पाचा आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.

मुंबईतील विमानतळावर सध्या प्रचंड ताण आहे. त्यातच ठाणे, कल्याण, वसई, विरार या भागात मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढत आहे. याशिवाय, जागतिक पर्यटकांना आकर्षित करण्याची पालघर जिल्ह्याची क्षमता आहे. त्यामुळे मुंबई विमानतळावरील ताण कमी करून पालघरमध्ये नवीन अत्याधुनिक विमानतळ उभा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. यासाठी प्रशासनाने देखील पालघरमध्ये सरकारी जमिनीची उपलब्धता असून, एमएमआरडीएच्या विस्तारित क्षेत्रातील प्रवासी आणि पर्यटकांना हे विमानतळ सर्वाधिक सोयीचे ठरेल असा प्रतिसाद दिला. त्यावर लवकरात लवकर या विमानतळाचा आराखडा तयार करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

दरम्यान, आजच्या बैठकीत शिर्डी येथील विमानतळाबाबतही चर्चा झाली. या विमानतळाची क्षमता वाढवण्याची गरज असल्याचे विमान प्राधिकरणाने स्पष्ट केले. ‘जेट’ सारखी विमान कंपनी देखील शिर्डीमधे प्रवासी सेवा सुरू करण्यास इच्छुक असल्याची माहिती या बैठकीत समोर आली. त्यानुसार शिर्डीच्या विमानतळाचा विस्तार आणि प्रवासी सेवा वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या.

- मुंबईवरचा भार कमी करण्याचा हेतू

- जागा संपादन अन् प्रकल्प अहवालाचे निर्देश

- पर्यटनासह प्रवासी सोयींचा आराखडा होणार

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रशासनाला सूचना