ST Tendernama
मुंबई

ठाणे विभागात 'या' ठिकाणी अद्ययावत बसपोर्ट; मुख्यमंत्र्यांचा निर्णय

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कळवा (Kalva) येथे राज्य परिवहन (एसटी) महामंडळाची विभागीय कार्यशाळा व विभागीय भांडार आस्थापना कार्यरत आहे. एसटी महामंडळाच्या बस गाड्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती केली जाते. तसेच विभागीय भांडारामार्फत ठाणे विभागातील सर्व आगारांना दैनंदिन लागणाऱ्या साहित्यांचा पुरवठा केला जातो. येथे कर्मचाऱ्यांसाठी, प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतूक सुविधा अपुऱ्या पडत आहे. त्यासाठी एसटी महामंडळाच्या उपलब्ध जागेवर कळवा येथे अद्ययावत बसपोर्ट विकसित करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.

शिंदे म्हणाले, कळवा येथे राज्य परिवहन महामंडळाची जागा आहे. येथे बस गाड्या दुरुस्तीसाठी गाळे, भांडार विभाग, वॉशिंग रॅम, वाचनमन केबिन, स्क्रॅपयार्ड, दुरुस्तीसाठी आलेल्या गाड्या उभ्या करण्यासाठी जागा, अशा आवश्यक सोयी सुविधांसह नव्याने आराखडा सादर करावा. तसेच ठाणे रेल्वे स्टेशनलगतच्या जागेवर एस.टी. डेपोसह सार्वजनिक पार्कींग, वाणिज्य वापराचे बांधकाम, चालक-वाहक विश्रांतीगृह, आरक्षण व चौकशी कक्ष, प्रवाशी उतरण्यासाठी स्वतंत्र सोय, कार्यालय आस्थापना याचा समावेश करुन सुधारित आराखडा तयार करावा. अशा सूचना देऊन ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक सुविधांचा मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा घेतला.

या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, ठाणे महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.