Mumbai  Tendernama
मुंबई

पुढील 40 वर्षे मुंबईकरांचा खड्डेमुक्त प्रवास!; मुख्यमंत्री शिंदेंचे भाकीत खरे ठरेल?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : जानेवारी २०२३ मध्ये मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याच्या कामास सुरुवात झाली आहे. शहरातील काँक्रीटच्या कामाला लवकरच सुरुवात होईल. उपनगरातील सिमेंट काँक्रीटच्या रस्तेकाम प्रगतिपथावर असून पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटचे होतील. ही रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यानंतर पुढील ४० वर्षे मुंबईकरांचा खड्डेमुक्त प्रवास होईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुंबई महापालिका मुख्यालयात मान्सूनपूर्व कामांचा आढावा शिंदे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टीत कुठलीही दुर्घटना घडू नये, यासाठी मुंबई महापालिकेसह विविध प्राधिकरण सज्ज झाली आहेत. तसेच पावसाळ्यात मुंबईकरांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून 'मिशन झिरो कॅज्युअल्टी' हे टार्गेट असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच मुंबईत पाणी तुंबू नये यासाठी खोलवर गाळ काढा, असे निर्देश पालिका प्रशासनाला दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुढील काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने नालेसफाईवर लक्ष केंद्रित केले आहे. खड्डेमुक्त रस्ते व दुर्घटना घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी मुंबई महापालिकेने घेतली आहे. नाल्यातील गाळ उपसा करण्याचे काम सुरू असून खोलवर खालपर्यंतचा गाळ उपसा होईपर्यंत काम करा, असे आदेश पालिकेला दिल्याचे ते म्हणाले. महापालिकेने जाहीर केलेल्या डॅशबोर्डवर १०० टक्के नालेसफाई झाल्याचे जाहीर केले आहे. मात्र, शहरासह दोन्ही उपनगरांत अनेक ठिकाणी नाले तुंबलेले असल्याचेच चित्र आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने केवळ नालेसफाईच्या कामाची आकडेवारी जाहीर केली असली तरीही जर कोणत्याही ठिकाणी पाणी तुंबल्याचे प्रकार घडल्यास संबंधित अधिकारी जबाबदार असतील आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिंदे यांनी यावेळी दिला. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत घट होत आहे. राज्यातही पाण्याने चिंता वाढवली आहे. मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन शिंदे यांनी केले.

घाटकोपर छेडानगर बेकायदा होर्डिंग दुर्घटनेत १७ जणांचा बळी गेल्यामुळे मुंबईतील सर्व बेकायदा होर्डिंग हटवण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे, तर कायदेशीर होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. मुंबईत तब्बल १४९ ठिकाणी दरडी, भिंती कोसळण्याचा धोका आहे. त्यामुळे या दुर्घटना टाळण्यासाठी दरडी सेफ्टी नेट लावून सुरक्षित करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. शिवाय या ठिकाणच्या रहिवाशांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था पालिका शाळांमध्ये न करता म्हाडा, एमएमआरडीएकडे असलेल्या 'पीएपी'च्या (प्रोजेक्ट अफेक्टेड पिपल) घरांची डागडुजी करून करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यावर पहिला परिणाम रेल्वे लोकलवर होतो आणि रेल्वे सेवा विस्कळीत होते. यंदाच्या पावसाळ्यात योग्य ती खबरदारी घेतली आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे हद्दीत २५ ठिकाणी फ्लडिंग पाईट असून पावसाळ्यात मुंबईची लाइफलाईन ठप्प झाली तर प्रवासी इच्छित स्थळी पोहोचावे यासाठी मध्य व पश्चिम रेल्वेच्या २५ स्थानकांजवळ बेस्टच्या बसेस तैनात असतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईतील सखल भागात पाणी साचले तर त्या ठिकाणच्या रहिवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेचे निवारा केंद्र उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच म्हाडाच्या ट्रान्झिट कॅम्पमधील रिकाम्या घरात तात्पुरता निवारा केंद्र उपलब्ध करण्यात येतील, असेही ते म्हणाले. मुंबईत पर्जन्य जलवाहिनी व मलनिःसारण विभागाच्या एकूण एक लाख मॅनहोल आहेत. यापैकी ६ हजार उघडी मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करण्यात आली असून उर्वरित उघडी मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी बंदिस्त करण्याचे काम प्रगतीपथावर सुरू असल्याचे ते म्हणाले.

पावसाळ्यात समुद्र, नदीचे पाणी मुंबईत शिरू नये यासाठी २७ ठिकाणी फ्लडिंग गेट्स उभारले असून ते पावसाळ्यात कार्यान्वित असतील, याची खात्री केल्याचे शिंदे यांनी सांगितले. नालेसफाई व इतर पावसापूर्वीची कामे समाधानकारक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांवर मात्र कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. यावेळी पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी, पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते.