Eknath Shinde Tendernama
मुंबई

Eknath Shinde : पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र देशात नंबर एकवर

टेंडरनामा ब्युरो

नवी मुंबई (Navi Mumbai) : राज्यात सर्वत्र विविध प्रकल्प, विकास कामे सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ जवळपास दोन लाख कोटींचे प्रकल्प राबवीत आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या निर्मितीत महाराष्ट्र राज्य देशात क्रमांक एकवर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी वाशी येथे केले.

सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्र. ३ च्या मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या उत्तर वाहिनी मार्गिकेचे उद्‍घाटन व रेवस (रायगड) ते रेडी (सिंधुदुर्ग) या सागरी महामार्गावरील सात खाडी पुलांच्या कामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, माजी खासदार राहुल शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. यामध्ये रेवस-रेडी सागरी महामार्गावरील धरमतर , कुंडलिका, आगरदांडा, बाणकोट, केळशी, जयगड आणि कुणकेश्वर या सात खाडी पुलांचे भूमीपूजन दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले. या सात खाडी पुलांची एकूण लांबी २६.७० किलोमीटर असून त्यासाठी ७ हजार ८५१ कोटींची निधी मंजूर करण्यात आला आहे.