Eknath Shinde Tendernama
मुंबई

मुख्यमंत्र्यांचे ठाण्याला पहिले गिफ्ट; सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या कामाचे टेंडर तातडीने काढण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले. सर्व अडथळे दूर झाल्यानंतर सुद्धा या रुग्णालाची टेंडर प्रक्रिया मागील काही महिने प्रलंबित होती. ९०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी ५२७ कोटीचा खर्च येणार आहे. त्यानुसार, आता येत्या काही महिन्यातच या रुग्णालयाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ही टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील रुग्णांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय खूप उपयुक्त ठरणार आहे. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाची उभारणी ब्रिटिश काळात म्हणजेच १९३६ मध्ये करण्यात आली होती. या जुन्या इमारती अतिशय जीर्ण आणि वापरण्यास अयोग्य झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या जुन्या इमारती पाडून त्याजागी सुपर स्पेश्यालिटी रुग्णालय उभारण्यास राज्य शासनाने ९ मार्च २०१८ मध्ये मान्यता दिली होती.

ठाणे जिल्हा रुग्णालय ३६७ खाटांचे आहे. त्यात वाढ करून ५७४ खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा सुरुवातीला प्रस्ताव होता. त्यासाठी ३१४ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. काही कारणास्तव प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे निधी खर्च झाला नव्हता. त्याचदरम्यान नगरविकास विभागाने मंजूर केलेल्या नवीन एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार प्रस्तावित भूखंडावर ५.३० इतका चटई क्षेत्र निर्देशांक लागू झाला. त्यानुसार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रुग्णालयाचा सुधारित प्रस्ताव तयार केला. त्यास मंजुरी मिळावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. पूर्वीच्या प्रस्तावात सहा मजली इमारत प्रस्तावित होती.

नव्या प्रस्तावानुसार दहा मजली इमारत होणार असून त्यास राज्य शासनाने मान्यता दिली होती. यामुळे ५७४ खाटांऐवजी ९०० खाटांचे रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. या कामासाठी राज्य शासनाने ५२७ कोटी ४१ लाखांचा निधी अडीच महिन्यांपूर्वी मंजूर केला आहे. या हॉस्पिटलमध्ये २०० सुपर स्पेशालिटी, २०० लहान मुले, डिलिव्हरी आणि महिला व ५०० खाटा जनरल रुग्णांसाठी ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जनरल खाटांमध्ये आर्थो, डोळे, रक्ताचे आजार, ज्येष्ठ नागरिक, डायलिसिस, आयसीयू, नाक, कान घसा आदी सर्वांचा समावेश असणार आहे. सर्व अडथळे दूर झाल्यानंतर या कामाची टेंडर प्रक्रिया मागील काही महिने प्रलंबित होती. दरम्यान बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाची टेंडर तत्काळ काढण्याचे व पुढील पंधरा दिवसात प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे आता येत्या काही दिवसात या कामाचे टेंडर निघणार असून प्रत्यक्ष कामाला एक ते दीड महिन्यात सुरुवात होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इमारत उभारणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे टेंडर प्रक्रिया याच विभागामार्फत राबवली जाणार आहे.