Eknath Shinde Tendernama
मुंबई

CM Shinde : मुंबईत अद्ययावत तंत्रज्ञानाने खड्डे बुजवा;नालेसफाईही..

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई शहरात विभागीय पातळीवर खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत. कोणत्याही नागरिकाच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करावी. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवून सर्व रस्त्यांवर वाहतूक तत्काळ सुरू होईल, असे पहावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. तसेच मुंबई महानगरात यंदा नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे चोखपणे पार पडली आहेत. त्याचा प्रत्यय जोरदार पावसावेळी पाण्याचा वेगाने निचरा होवून आला आहे. त्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे कौतुक केले पाहिजे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुंबईत पाऊस कोसळत असताना महापालिका आयुक्तांसह सर्व विभागांचे सहायक आयुक्त व सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर कार्यरत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. पावसाची परिस्थिती व अंदाज लक्षात घेवून स्थानिक प्रशासनाने योग्य ते निर्णय घेण्याचे निर्देश राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्पष्ट केले. भारतीय हवामान खात्याने मुंबईतील पावसाच्या शक्यतेसाठी दिलेल्या 'ऑरेंज अलर्ट' च्या पार्श्वभूमीवर नागरी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालिन व्यवस्थापन विभागाला भेट दिली. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. नागरिकांनी आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे अन्यथा घराबाहेर जावू नये, सुरक्षितस्थळी राहावे, पर्यटकांनी अकारण समुद्र किनारी जावू नये, असे आवाहन करतानाच घराकडे परतीचा प्रवास करत असणाऱ्या चाकरमान्यांची आवश्यकता असेल तेथे तात्पुरता निवारा व अल्पोपहाराची व्यवस्था करण्याचे निर्देशही यावळी मुख्यमंत्र्यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

मुंबईतील जनजीवन, महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजना, वाहतूक व्यवस्था तसेच पाणी साचणाऱ्या सखल ठिकाणांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षातून घेतला. बेस्ट आणि एसटी प्रशासनालाही नागरिकांसाठी वाहतुकीची पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. हिंदमाता, परळ, गांधी मार्केट, मिलन भुयारी मार्ग, अंधेरी भुयारी मार्ग या सखल भागातील स्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. कोणत्याही ठिकाणी पाणी साचले नाही. महानगरपालिकेची यंत्रणा पूर्णपणे कार्यरत असल्याचा हा परिणाम आहे. संपूर्ण मुंबईत मिळून सुमारे ४५० ठिकाणी पावसाचे पाणी उपसा करणारे पंप लावल्याचा परिणाम म्हणून पाण्याचा वेगाने निचरा झाला आहे, अशी माहिती शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

मुंबईत पर्जन्य जलवाहिन्या, मलनिसारण वाहिन्या आदींच्या प्रवेश मार्गांवर (मॅनहोल) असलेल्या झाकणाखाली जाळ्या लावण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार आतापर्यंत सखल भागातील सुमारे ३ हजार मॅनहोल कव्हरखाली जाळ्या लावण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरीत ठिकाणच्या मॅनहोल जाळ्या लावण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करावी. ज्याठिकाणी मॅनहोल चोरीचे प्रकार निदर्शनास येत आहेत, अशा ठिकाणी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत, असे शिंदे म्हणाले. विभागीय पातळीवर खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत. कोणत्याही नागरिकाच्या तक्रारीवर तातडीने कार्यवाही करावी. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून खड्डे बुजवून सर्व रस्त्यांवर वाहतूक तत्काळ सुरू होईल, असे पहावे, असे निर्देशही शिंदे यांनी दिले.

यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे उपस्थित होते. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुधाकर शिंदे, सहआयुक्त (शिक्षण) अजीत कुंभार, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) मिलीन सावंत, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडळकर, संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महेश नार्वेकर आदींनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने माहिती दिली.